अध्याय अकरावा
बाप्पांच्या उपदेशानुसार वागल्याने वरेण्य राजाचा उद्धार झाला. मनुष्य जन्माची ही खासियत आहे की, माणसाला स्वत:च्या स्वभावात सुधारणा करायची संधी देवाने त्याला दिली आहे. जो वाचक ह्या उपदेशाचे पालन करेल आणि स्वत:च्या व्यक्तीमत्वात सुधारणा करेल, तो निश्चितच सरळमार्गी होऊन शेवटी त्याचा उद्धार होईल. यालाच बाप्पा अनादिसिध्द योग म्हणतात. अनादि म्हणजे ज्याच्यावर काळाचा परिणाम होत नाही अशी गोष्ट. बाप्पांचा उपदेश अनादि असल्याने, काळ कोणताही असो त्यांच्या उपदेशानुसार जो वागेल त्याचा हा योग सिद्ध होऊन निश्चित उद्धार होईल. त्याला प्रपंच, प्रारब्ध व उपाधी याप्रसंगी मनस्वास्थ्य लाभलेले असल्याने समाधी अवस्थेत राहता येऊन त्याचे समाधान टिकून राहील. हीच कैवल्यावस्था होय. ही प्राप्त करण्यासाठी ध्यानधारणा व समर्पणयुक्त कर्म, भक्ती, मंत्रतंत्र हे मार्ग सांगितलेले आहेत. पहिल्या मार्गाने जाणे सामान्य माणसाला सहजी शक्य होत नाही कारण प्रपंचाबद्दल आवश्यक ती उदासीनता त्याच्या मनात चटकन येत नाही. ती येण्यासाठी साधकाला पूर्वजन्मीच्या साधनेची पार्श्वभूमी आवश्यक असते.
अशी तयारी असलेला साधक याजन्मी लहानपणापासूनच संसार वगैरे भानगडीत न पडता ध्यानधारणेच्या मागे असतो. म्हणून सामान्य मनुष्यालासुद्धा कैवल्यावस्था प्राप्त करून घेता यावी या उद्देशाने बाप्पांनी दुसऱ्या म्हणजे समर्पण मार्गाचा उपदेश केलेला आहे. प्रत्येक कर्म, पूजाअर्चा, दानधर्म करताना ईश्वर ते आपल्याकडून करून घेत आहे हे लक्षात घेऊन त्याची आठवण करून ते करायचं आणि करून झाल्यावर ते त्याचंच असल्याने त्याला अर्पण करायचं असं या उपदेशाचं सूत्र आहे. असं करत गेलं की, माणसाच्या मनातली मी कर्ता आहे ही भावना लोप पावते आणि त्याला जोडून येणारे कामक्रोधादि विकार आपोआप नाहीसे होतात. असे भक्त ईश्वराचे लाडके होतात आणि तो आपणहून त्यांना कैवल्यपद प्रदान करतो. जगातल्या प्रत्येकाला अशा पद्धतीने ईश्वराची भक्ती करून स्वत:चा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे.
बाप्पा राजाला पुढे म्हणाले, वरेण्या, तू माझा लाडका आहेस म्हणून तुला मी हा योग सांगितला आहे. ह्या योगाचा उपयोग करून घेऊन परमसिद्धी प्राप्त करून घे असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
युक्ष्व योगं मयाख्यातं नाख्यातं कस्यचिन्नृप ।
गोपयैनं ततऽ सिद्धिं परां यास्यस्यनुत्तमाम् ।। 36।।
अर्थ- हे नृपा, पूर्वी कोणाला न सांगितलेल्या पण तुला सांगितलेल्या या योगाने युक्त हो. तसेच या योगाचे रक्षण कर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ व अत्यंत उत्तम अशी सिद्धि पावशील.
विवरण- वरेण्य राजासारख्या खास भक्तासाठी बाप्पांनी हा योग सांगितला आहे याची जाणीव बाप्पा करून देतात. ते राजाला म्हणतात, तू सुरवातीला मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी असा प्रश्न विचारला होतास त्याचं सविस्तर उत्तर मी दिलेलं आहे. याप्रमाणे वागत गेल्यास तर मोक्षप्राप्ती निश्चित आहे. बाप्पा पुढे सांगतात की, ज्याची मी सांगितलेल्या योगावर श्रद्धा नसेल त्याला या योगाबद्दल काहीही सांगू नकोस. एव्हढे सांगून बाप्पा अदृष्य झाले. बाप्पा आणि वरेण्य यांच्यातील संवाद येथे संपला. बाप्पांनी सांगितलेला योग वरेण्याने कसा साधला याबाबत व्यास मुनी काय सांगतात ते इथून पुढील श्लोकात सांगितले आहे.
इति तस्य वचऽ श्रुत्वा प्रसन्नस्य महात्मनऽ ।
गणेशस्य वरेण्यऽ स चकार च यथोदितम् ।। 37 ।।
अर्थ- व्यास म्हणतात, प्रसन्न झालेल्या महात्म्या गणेशाचे या प्रकारचे भाषण श्रवण केल्यावर वरेण्याने त्याने सांगितल्याप्रमाणे केले.
क्रमश:








