निपाणी, चिकोडीत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन
प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहर व ग्रामीण भागात अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शुक्रवारी सुमारे 80 हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बहुतांशी गणेश मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. संध्याकाळी 7 नंतर सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका पहाटे 3 वाजेपर्यंत सुरु होत्या. निपाणीत महादेव गल्ली, साखरवाडी, कुंभारगल्ली, बसवाननगर, श्रीनगर, आंदोलननगर, संभाजीनगर आदी ठिकाणच्या गणेश मूर्तींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
निपाणी तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम झाले नसले तरी आगमन व विसर्जन मिरवणुकांवर मोठय़ा प्रमाणात खर्च झाला. बहुतांशी मंडळांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. तालुक्यात कोणताच अनुचित प्रकार न घडता सण पार पडल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. अद्यापही ग्रामीण भागात अनेक गणेश मूर्तींचे विसर्जन होणे बाकी आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
चिकोडीत गणरायाला निरोप
चिकोडी ः गेल्या वर्षापासून चिकोडीतील गणेश मूर्ती विसर्जन सोहळय़ाची एकाच छताखाली मिरवणुकीची परंपरा यंदाही जोपासण्यात आली. माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमास शहरातील सर्वच मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. शुक्रवारी सायंकाळी विसर्जन मिरवणूक हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व डीजेच्या ठेक्यात काढण्यात आली.
प्रारंभी माजी नगराध्यक्ष जगदीश कवटगीमठ, नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ यांच्यासह इतर नगरसेवकांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. बसस्थानकापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. डीजेच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत असल्याचे पहावयास मिळाले. बस स्थानक ते नगरपालिकेपर्यंतचा संपूर्ण रस्ता मिरवणुकीने व्यापला होता. मंडळाच्या मूर्तीला मालार्पण करून नगरपालिकेतर्फे निरोप देण्यात येत होता.
संकेश्वरात मोरया।़।़ चा गजर
संकेश्वर ः मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! च्या गजरात शुक्रवारी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रात्री 11 पर्यंत शहरासह ग्रामीण भागातील 150 मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली.
गांधी चौक, आझाद रोड, सुभाष रोड, जुना पुणे-बेंगळूरमार्ग, मड्डी गल्ली, संसुध्दी गल्ली मार्गे नेहरुरोड येथील मूर्तीचे विसर्जन करण्याची धावपळ सुरु होती. पोलीस उपनिरिक्षक गणपती कोगनोळी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 45 पोलीस, राखीव पोलीस दलाच्या 2 तुकडय़ा व राज्य राखीव दलाची 1 तुकडी तैनात करण्यात आली होती.









