मंडोळीत 110 वर्षापूर्वीचा वटवृक्ष जमीनदोस्त : खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय
वार्ताहर /किणये
गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंडोळी गावातील चव्हाटा मंदिर जवळ असलेले एकशे दहा वर्षापूर्वीचे वडाचे झाड शुक्रवारी सकाळी कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड विद्युत तारांवर कोसळल्यामुळे दोन खांबही कोसळले. मंडोळी येथील चव्हाटा मंदिराजवळ स्थळ देवस्थानचे सर्वात जुने वडाचे झाड होते. झाडानजीक रोज नागरिक बसत होते. हे झाड गेल्या 110 वर्षांपासून गावातील नागरिकांना सावली देत होते.
कार-बैल गाडीचेही नुकसान
तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. झाड विद्युत तारांवर पडल्याने दोन विद्युत खांबही कोसळले. विद्युत खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. एक खांब बाजूलाच असलेल्या कार गाडीवर पडल्यामुळे गाडीची काच फुटली आहे. तर झाडाखाली सापडून शंकर रवळू दळवी यांच्या बैलगाडीचे नुकसान झाले आहे.
मोठी दुर्घटना टळली
सकाळची वेळ असल्यामुळे गावात नागरिकांची वर्दळ सुरू होती. मात्र झाड पडण्याचा आवाज आल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. सारे जण आजूबाजूला पळून गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य व गावातील पंचमंडळी, नागरिक व तरुणांनी झाड बाजूला करून नागरिकांना ये-जा करण्यास वाट मोकळी करून दिली.
मजगाव शेतवडीत पावसामुळे विजेचे खांब कोसळले
मजगावच्या रेल्वे गेटसाठी जोडणी केलेले विद्युतखांब गुरुवारी दुपारी वारा व पावसाच्या जोरामुळे उन्मळून शेतवडीत पडले आहेत. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सदर शेतवडीत नेहमी शेतकरी काम करीत असतात व सध्या रस्त्यावरही नेहमी वर्दळ असते. परंतु सुदैवानेच जीवितहानी झाली नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.









