दसरा-दिवाळीमुळे जोडून सुटय़ा
प्रतिनिधी /बेळगाव
दसरा व दिवाळी सण एकाच महिन्यात आल्यामुळे ऑक्टोबरमध्ये सुटय़ांचा सुकाळ असणार आहे. या महिन्यात एकूण 11 दिवस बँकांना सुटी असणार आहे. त्यामुळे सुटय़ांपूर्वीच नागरिकांना बँकांचे तसेच सरकारी कार्यालयांचे व्यवहार करावे लागणार आहेत.
मंगळवार दि. 4 रोजी खंडेनवमी व 5 रोजी दसरा असल्यामुळे बँकांना सुटय़ा देण्यात आल्या आहेत. 8 रोजी दुसरा शनिवार तर 22 रोजी चौथा शनिवार, 24 रोजी नरक चतुर्दशी व 26 रोजी दिवाळी पाडवा असल्यामुळे सुटी मिळणार आहे. या महिन्यात एकूण 5 रविवार आल्यामुळे बँका तसेच सरकारी कार्यालयांना 11 दिवस सुटी राहणार आहे. त्यामुळे बँक कर्मचारी, सरकारी कर्मचाऱयांकडून आतापासूनच सुटीचे प्लॅनिंग केले जात आहे.
दोन सुटय़ा आल्या रविवारी
रविवार दि. 2 रोजी गांधी जयंती तर रविवार दि. 9 रोजी ईद-ए-मिलाद आहे. दरवषी या दोन्ही दिवशी सरकारी सुटी असते. परंतु यावषी या दोन्ही सुटय़ा रविवारी आल्यामुळे दोन सुटय़ा कमी झाल्या आहेत. या सुटय़ा असत्या तर 13 दिवस बँका बंद राहिल्या असत्या.
आर्थिक व्यवहारांवर होणार परिणाम
बँका या आर्थिक व्यवहारांच्या कणा असतात. या बंद असल्या की सर्वच आर्थिक व्यवहार कोलमडतात. दसरा व दिवाळीमध्ये नवीन वाहने, फ्लॅट खरेदी, घर खरेदी केली जात असल्याने पैशांची जमवाजमव, कर्ज काढणे या प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे नागरिकांना सुटय़ा वगळून आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत.









