खासदार जगदीश शेट्टर यांची सूचना : जि. पं. सभागृहात बँक विकास आढावा बैठक
बेळगाव : जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत बँकांकडे सादर करण्यात आलेले अर्ज त्वरित निकाली काढावेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे अर्ज विनाविलंब मंजूर करावेत. तसेच पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करून देऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली. जि. पं. सभागृहात सोमवारी झालेल्या बँक विकास आढावा बैठकीत ते बोलत होते.
शेट्टर म्हणाले, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), अटल पेन्शन योजना (एपीवाय) आदी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करावी. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत समाविष्ट करून घेऊन नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच शेतकऱ्यांनीही सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बँक अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत पावले उचलावीत
जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांनी विविध विभागांतर्गत आलेले अर्ज नियमानुसार लवकरात लवकर निकाली काढावेत. अर्ज निकाली काढण्यासाठी विलंब झाल्यास अर्जदारांना समस्या निर्माण होतात. यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी. अलिकडच्या काळात चोरी व बँक दरोड्याच्या घटना घडत आहेत. यामुळे बँक अधिकाऱ्यांनी बँकेच्या सुरक्षेबाबत पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.
कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत घोडके म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँकांनी एकत्रिपणे कृषी 1406 कोटी, औद्योगिक 2653.27 कोटी, शैक्षणिक क्षेत्राला 13.57 कोटी, गृहकर्जासाठी 75.03 कोटी असे एकूण 10801.80 कोटी रुपये वितरीत केले आहेत. चालू वर्षात 36237.48 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटांच्या सदस्यांनी उत्पादित केलेल्या बेळगाव संजीवनी शेवयाचे प्रकाशन केले. जि. पं. योजना संचालक रवि बंगारप्पन्नवर, आरबीआय साहाय्यक व्यवस्थापक आर. प्रभाकर, नाबार्ड अधिकारी अभिवन यादव यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते.









