सायबर गुन्हेगारांची शक्कल : उद्योजकाच्या खात्यातील 18 लाख रुपये हडप
बेळगाव : सायबर गुन्हेगारी थोपविण्यासाठी सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तरी सायबर गुन्हेगारांचे आव्हान काही कमी झाले नाही. रोज नवनवीन क्लृप्त्या वापरून सर्वसामान्य नागरिक, उद्योजकांच्या बँक खात्यांना खिंडार पाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. एका उद्योजकाच्या बँक खात्यातून 18 लाख रुपये हडपल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी गुन्हेगाराने नामी शक्कल वापरली असून त्यामुळे बँक अधिकारी व तपास अधिकारीही हैराण झाले आहेत. बँक खातेधारक उद्योजक आपल्या घरीच आहेत. पैसे काढण्यासाठी ते बँकेत पोहोचले नाहीत. किंवा सायबर गुन्हेगारांपैकी कोणीही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बँक खात्याविषयी माहिती घेतली नाही. तरीही त्यांच्या खात्यातील 18 लाख 71 हजार रुपये हडपण्यात आले. केवळ 13 मिनिटांत तीन वेळा उद्योजकाच्या बँक खात्यातून ही रक्कम उचलण्यात आली आहे.
एफआयआर दाखल
दि. 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. यासंबंधी शहर सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी बँक खात्यातील रक्कम हडपण्यासाठी वापरलेली युक्ती पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. वारंवार असे प्रकार घडू लागले तर बँक खात्यांच्या सुरक्षेविषयी शंका उत्पन्न होऊ लागली आहे. सध्या सीईएनचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे या प्रकरणी तपास करीत आहेत. 27 सप्टेंबर रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकांना एक कॉल येतो. त्यांच्या बँकेत खाते असलेल्या उद्योजकाच्या नावाने भामटे व्यवस्थापकाशी संभाषण करतात. आम्ही तुमच्याकडे कोटीची एफडी ठेवणार आहे, सध्या आपल्या खात्यातून रक्कम काढायची आहे, असे सांगतात. या संभाषणानंतर त्या उद्योजकांच्या नावे बँकेला एक ई-मेल येतो. ई-मेलमधील संदेशावरून व्यवस्थापक ई-मेलमध्ये सुचविलेल्या बँक खात्यात तीनवेळा 18 लाख 71 हजार रुपये रक्कम ट्रान्स्फर करतात. तिसऱ्यांदा बँक खात्यातून रक्कम काढल्याचे मेसेज संबंधित उद्योजकाच्या मोबाईलवर गेला. त्यामुळे त्यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्यातील पैसा कोणाच्या खात्यात जमा करत आहात? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनाही आता आपलीच फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा सारा प्रकार उघडकीस आला.
सतर्कता बाळगण्याची गरज
बँक खात्यातून परस्पर रक्कम पळविण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या घडवतात. नागरिकांनी आपल्या खात्यातील रक्कम सुरक्षित रहावी, यासाठी गुन्हेगारांना सहजपणे माहिती मिळेल, अशी कोणतीच कृती करू नये. नागरिकांबरोबरच आता बँक अधिकाऱ्यांनीही सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले.









