वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कर्जधारकांना चांगलेच धक्के सहन करावे लागत आहेत. विविध बँकांनी आतापर्यंत आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. यामध्ये आता तीन नव्या बँकांचा समावेश झाला आहे. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया तसेच बंधन बँक या तीन बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरामध्ये वाढ केली आहे. यापैकी दोन बँकांचा कर्जदर 1 मार्चपासून अंमलात आला असून बंधन बँकेचा नवा व्याजदर 28 फेब्रुवारीपासून अंमलात आला आहे. याआधी पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांनीदेखील कर्जाच्या व्याजदरामध्ये पाव टक्का इतका वाढ केली आहे. यांचेही नवे व्याजदर 1 मार्चपासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पाव टक्का व्याजदर वाढवू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष संपायच्या आधीच विविध बँकांनी व्याजदर वाढ केल्याने कर्जदार चिंतेत सापडले आहेत. मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपोदरामध्ये 2.50 टक्के इतकी वाढ केली आहे. बँक ऑफ इंडियाचे कर्ज 0.10 टक्के इतके महाग झाले आहे. नवा दर एक 8.5 टक्के असणार आहे. बंधन बँकेनेदेखील व्याजदरामध्ये वाढ केली असून तीन वर्षाकरिता 10.96 टक्के असेल.
कर्जदरामध्ये वाढ केली जात असताना दुसरीकडे गुंतवणूकदारांना मात्र दिलासा मिळताना दिसतो आहे. विविध बँकांनी आपल्या फिक्स डिपॉझिट म्हणजेच ठेवींवरचे व्याजदर वाढवून देण्यास सुरुवात केली आहे. इक्वीटॉस स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षासाठी ठेवींवर 7.75 टक्के व्याज देणार आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकदेखील ठेवींवर 8.51 टक्के इतके व्याज देणार आहे. ज्ये÷ नागरिकांसाठी 8.76 टक्के व्याज वार्षिक तत्वावर दिले जाणार आहे.









