सांगली :
नामांकित बँकेत खोटे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावर कर्ज काढून बँकेची चार लाख सहा हजार ९८६ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत दि. १४ डिसेंबर २०२२ ते दि. १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शेखर जमादार (रा. तुंग), नेमिनाथ धनपाल गलाडगे (रा. जैनबस्तीनजीक, कसबे डिग्रज, ता. मिरज) आणि जगदीश आदिनाथ पाटील (रा. बागणी, ता. वाळवा) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बँकेचे व्यवस्थापक नानासाहेब किसन सरक यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित नौशाद जमादार यांनी ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बँकेत गहाण ठेवून त्यावर एक लाख २२ हजार ८५८ रुपये कर्ज घेतले. काही दिवसांनी पुन्हा २९.९० ग्रॅम आणि ३२.८० ग्रॅम अशा दोन सोन्याची चेन गहाण ठेवून त्यावर २ लाख २३ हजार ०८६ चे कर्ज घेतले. दि. १७ रोजी बँकेची तपासणी झाली. गहाण सोने देखील तपासण्यात आले. यामध्ये सोनार शितल शहा यांनी संशयिताने ठेवलेले सोने खोटे असल्याचे सांगितले. संशयित नौशाद जमादार याने नेमिनाथ गलाडगे आणि जगदीश पाटील यांच्या सहकार्याने सदरचे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेत सादर केल्याचे निष्पन्न झाले. कर्जाची रक्कम तीन लाख ४५ हजार ८८६ तसेच त्यावरील व्याज ६१ हजार १०० अशी एकूण चार लाख ६ हजार ९८६ रुपयांची तिघांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.








