आशिया चषक टी2-20 : हाँगकाँगवर 7 विकेट्सने मात : लिटन दासचे अर्धशतक
वृत्तसंस्था/अबु धाबी
गुरुवारी आशिया चषक स्पर्धेत खेळवल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने नवख्या हाँगकाँगवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने 7 गडी गमावत 143 धावा केल्या. यानंतर बांगलादेशने विजयी लक्ष्य 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. लिटन दासने शानदार अर्धशतकी खेळी साकारत बांगलादेशच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बांगलादेशचा पुढील सामना दि. 13 रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगच्या डावाची सुरुवात खराब झाली.
डावातील दुसऱ्या षटकांत अंशी रथला 4 धावांवर तस्कीन अहमदने बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर बाबर हयात देखील 14 धावा काढून माघारी परतला. ही जोडी बाद झाल्यानंतर झीशान अली आणि निझाकत खान यांनी संघाचा डाव पुढे नेला. निझाकतने 40 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 42 धावा केल्या. तर झीशान अलीने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांचे योगदान दिले. झीशान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार यासीम मुर्तझाने 19 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारासह 28 धावा फटकावल्या. यादरम्यान, झीशान आणि निझाकत लागोपाठ बाद झाल्याने हाँगकाँगच्या धावसंख्येला आळा बसला. यानंतर इतर फलंदाजांनीही निराशा केल्याने त्यांना 20 षटकांत 7 गडी बाद 143 धावांपर्यंत मजल मारता आली.
बांगलादेशचा सहज विजय
हाँगकाँगने विजयासाठी दिलेले 144 धावांचे टार्गेट बांगलादेशने 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 24 धावांवर बांगलादेशला पहिला धक्का बसला. सलामीवीर परवेज होसेन 19 धावा काढून बाद झाला. तंजिद हसनही (14) फार काळ टिकला नाही. सलामीचे दोघे बाद झाल्यानंतर लिटन दास आणि तौहिद यांनी 95 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. लिटन दासने अर्धशतकी खेळी साकारताना 39 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 59 धावांचे योगदान दिले. तौहिदने त्याला चांगली साथ देताना 35 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
हाँगकाँग 20 षटकांत 7 बाद 143 (झीशान अली 30, बाबर हयात 14, निजाकत खान 42, यासिम मुर्तझा 28, तस्कीन अहमद, तंजिद हसन आणि रिशाद होसेन प्रत्येकी दोन बळी) बांगलादेश 17.4 षटकांत 3 बाद 144 (परवेज होसेन 19, तंजिद हसन 14, लिटन दास 59, तौहिद 35, अतिक इक्बाल 2 बळी).









