वृत्तसंस्था /मीरपूर
येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर यजमान बांगलादेशने अफगाणवर 370 धावांची भक्कम आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. अफगाणचा पहिला डाव 146 धावावर आटोपल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात दिवसअखेर 1 बाद 134 धावा जमवल्या. झाकीर हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांनी नाबाद अर्धशतके झळकवली. या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने 5 बाद 362 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 86 षटकात 382 धावात आटोपला. बांगलादेशचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 20 धावात बाद झाले. बांगलादेशच्या पहिल्या डावात नजमुल हुसेन शांतोने 2 षटकार आणि 23 चौकारासह 146, मेहमुदुल हसन जॉयने 9 चौकारासह 76, मुशफिकर रहीमने 4 चौकारासह 47, मेहदी हसन मिराजने 8 चौकारासह 48 धावा जमवल्या. अफगाणतर्फे निजाद मसूद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 79 धावात 5 तर अहमदझाईने 39 धावात 2 तसेच झहीर खान, अमीर हमझा व बाहमत शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर अफगाणचा पहिला डाव केवळ 39 षटकात 146 धावात आटोपला. अफगाणच्या केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अफसर झजाईने 6 चौकारासह 36 तर नासीर जमालने 6 चौकारासह 35, अब्दुल मलिकने 2 चौकारासह 17 तसेच करीम जेनतने 2 चौकारासह 23 धावा जमवल्या. बांगलादेशच्या इबादत हुसेनने 47 धावात 4 तर एस. इस्लाम, टी. इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यानीं प्रत्येकी 2 गडी बाद केले. बांगलादेशने अफगाणवर पहिल्या डावात 236 धावांची आघाडी मिळवली.फॉलोऑन उपलब्ध असतानाही बांगलादेशने तो दिला नाही आणि त्यांनी आपल्या दुसऱ्या डावात सुरुवात केली. बांगलादेशने दिवसअखेर दुसऱ्या डावात 23 षटकात 1 बाद 134 धावा जमवल्या. सलामीचा मेहमुदुल हसन 4 चौकारासह 17 धावा बाद झाल्यानंतर झाकीर हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 116 धावांची शतकी भागीदारी केली. झाकीर हसन 6 चौकारासह 54 तर नजमुल हुसेन शांतो 8 चौकारासह 54 धावावर खेळत आहेत. अफगाणच्या हमझाने 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून बांगलादेशचा संघ 370 धावांच्या भक्कम आघाडीसह विजयाकडे वाटचाल करीत आहे. दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी 16 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 86 षटकात सर्व बाद 382 (नजमुल हुसेन शांतो 146, मेहमुदुल हसन 76, मुशफिकुर रहीम 47, मेहदी हसन मिराज 48, मोमिनूल हक 15, निजाज मसूर 5-79, अहमदझाई 2-39, झहीर खान 1-98, अमीर हमझा 1-85, रेहमत शहा 1-30), अफगाण प. डाव 39 षटकात सर्व बाद 146 (अफसर झजाई 36, नासीर जमाल 35, करीम जनत 23, अब्दुल मलिक 17, इबादत हुसेन 4-47, एस. इस्लाम 2-28, मेहदी हसन 2-15, टी. इस्लाम 2-7), बांगलादेश दु. डाव 23 षटकात 1 बाद 134 (मेहमुदुल हसन 17, झाकीर हसन खेळत आहे 54, नजमुल हुसेन शांतो खेळत आहे 54, अमीर हमजा 1-27).









