सैफ हसन, रिदॉय यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ दुबई
‘सामनावीर’ सैफ हसन आणि रिदॉय यांची दमदार अर्धशतके तसेच मुस्ताफिजूर रेहमान आणि मेहदी हसन मिराजच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने लंकेचा केवळ 1 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. लंकेच्या शनाकाचे नाबाद अर्धशतक वाया गेले. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 फेरीतील हा पहिला सामना होता.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 7 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 19.5 षटकात 6 बाद 169 धावा जमवित थरारक विजय नोंदविला.
लंकेच्या डावात शनाकाने 37 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 64 तर कुशल मेंडीसने 25 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 34, निशांकाने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 कर्णधार आसालेंकाने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 तर कुशल परेराने 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे मुस्ताफिजूर रेहमानने 20 धावांत 3 तर मेहदी हसनने 25 धावांत 2 आणि तस्किन अहमदने 37 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशला विजय मिळविण्यासाठी शेवटच्या षटकात चांगलेच छगडावे लागले. सलामीच्या सैफ हसनने 45 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 61, रिदॉयने 37 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावा झोडपल्या. शमिम हुसेनने 12 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 14 धावा केल्या. बांगलादेशला विजयासाठी डावातील शेवटच्या षटकात झगडावे लागले. या षटकामध्ये बांगलादेशचे झाकर अली आणि मेहदी हसन मिराझ हे बाद झाले. पण शेवटचा चेंडू बाकी असताना नेसूम अहमदने विजयी धाव घेत लंकेचे आव्हान संपुष्टात आणले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 59 धावा जमविताना 1 गडी गमाविला. या स्पर्धेत आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 फेरीतील दुसरा सामना खेळविला जात आहे.
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 7 बाद 168 (शनाका नाबाद 64, कुशल मेंडीस 34, निशांका 22, कुशल परेरा 16, आसालेंका 21, मुस्ताफिजूर रेहमान 3-20, मेहदी हसन 2-25, टी. अहमद 1-37), बांगलादेश 19.5 षटकात 6 बाद 169 (सैफ हसन 61, दास 23, रिदॉय 58, शमीम हुसेन 14, हसरंगा आणि शनाका प्रत्येकी 2 बळी, तुषारा व चमीरा प्रत्येकी 1 बळी).









