भारत आणि बांगलादेश महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यामधील शेवटचा सामना शनिवारी बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने खराब अंपायरिंगवर नाराजी व्यक्त केली. या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या सामन्यादरम्यान अंपायरिंगचा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अंपायरिंगसाठी आधीच तयार असू. मी याआधीही सांगितले होते की येथे अत्यंत खराब अंपायरिंग आहे. पंचांच्या काही निर्णयांवर नाखूश असल्याची प्रतिक्रिया तिने यावेळी दिली.
नेमकं काय घडलं?
भारताच्या डावामधील 34 व्या षटकात हरमनप्रीतने नाहिदा अख्तरविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडला लागला. यावेळी नाहिदाचा चेंडू मधल्या आणि लेग स्टंपवर जात होता. गोलंदाजाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले आणि पंच तनवीर हसन यांनी हरमनप्रीतला बाद घोषित केले. या दरम्यान, चेंडूदेखील हवेत गेला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर हरमनप्रीत चांगलीच चिडली. रागाच्या भरात तिने आपली बॅट स्टंपवर मारली. इतकंच नाही तर पॅव्हेलियनमध्ये जात असताना अंपायरला रागाने ती काहीतरी बोलताना दिसली. दरम्यान, हरमनप्रीतच्या या कृत्यामुळे तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.









