अगरतळा उच्चायोगमध्ये व्हिसा सेवा पुन्हा सुरू
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशने भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बांगलादेशने बुधवारपासून अगरतळा येथील उच्चायोगात पुन्हा एकदा व्हिसा अन् कौन्स्युलर सेवा सुरू केली आहे. त्रिपुराची राजधानी अगरतळामध्ये बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायोगाने ही घोषणा केली आहे. बांगलादेश सहाय्यक उच्चायोगाने 3 डिसेंबर रोजी स्वत:च्या सेवा रोखल्या होत्या. हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या एका समुहाकडून उच्चायोग परिसरात घुसखोरी केल्यावर सेवा रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बांगलादेश सहाय्यक उच्चायोगाच्या सर्व व्हिसा आणि वाणिज्य दूतावास सेवा 5 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होतील असे बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्त कार्यालयाचे प्रथम सचिव मोहम्मद अल अमीन यांनी सांगितले आहे. डिसेंबरमध्ये उच्चायोगात तोडफोडीच्या घटनेनंतर बांगलादेश विदेश मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना पाचारण करत नाराजी व्यक्त केली होती.
तर त्रिपुरा सरकारने वाणिज्य दूतावासाच्या सुरक्षेत झालेल्या चूक प्रकरणी 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली होती. या घटनेत सामील 7 जणांना अटकही करण्यात आली होती. कथित निष्काळजीपणासाठी तीन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. तर एका पोलीस उपअधीक्षकाला पोलीस मुख्यालयात अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आला होता. तर तोडफोडीच्या घटनेवरून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तोडफोडीच्या घटनेनंतर वाणिज्य दूतावासातील सुरक्षेत वाढ करण्यात आली. तसेच सीआरपीएफ आणि त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आले.









