दुसरी कसोटी पहिला दिवस : उमेश यादव, रविचंद्रन अश्विन यांची भेदक गोलंदाजी, उनादकटचे 2 बळी, मोमिनुल हकचे अर्धशतक

वृत्तसंस्था /मिरपूर
वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांनी जुन्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी करत यजमान बांगलादेशला पहिल्या डावात 227 धावावर रोखले. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील गुरुवारपासून सुरू झालेल्या दुसऱया कसोटीत भारताने दिवसअखेर बिनबाद 19 धावा जमवल्या. उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 4 तर जयदेव उनादकटने दोन बळी मिळवले.

या मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकून बांगलादेशवर यापूर्वीच आघाडी मिळवली आहे. या दुसऱया सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला सुरुवातीला साथ देत होती. चेंडू अनपेक्षितरित्या उसळत होते पण त्यानंतर फिरकी गोलंदाजीला ही खेळपट्टी साथ देऊ लागल्याने लेगस्पिनर कुलदीप यादवला वगळण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. भारतीय संघात तब्बल 12 वर्षानंतर प्रवेश करणाऱया नवोदित गोलंदाज जयदेव उनादकटने बांगलादेशचा सलामीचा फलंदाज झाकीर हसनला स्लीपमध्ये राहुलकरवी झेलबाद केले. उमेश यादव आणि मोहमद सिराज यांनी नव्या चेंडूवर सुरुवातीला 9 षटके टाकली पण त्यांना यश मिळू शकले नाही. नजमूल हुसेन शांतो आणि झाकीर हसन यांनी पहिल्या गडय़ासाठी 39 धावांची भागीदारी केली. झाकीर हसनने 1 चौकारासह 15 धावा जमवल्या. मात्र बांगलादेशची ही सलामीची जोडी फोडण्यात उनादकटला यश मिळाले. कर्णधार राहुलने गोलंदाजीत बदल करून अश्विनकडे चेंडू सोपविला. अश्विनने सलामीचा फलंदाज नजमूल हुसेनला पायचित केले. त्याने 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. उमेश यादव एका बाजूने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. त्याचे चेंडू खेळताना बांगलादेशच्या फलंदाजांना खूपच अवघड गेले. उमेश यादवने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला आऊटस्विंगरवर पुजाराकरवी झेलबाद केले. शकीब हसनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमवल्या. बांगलादेशची स्थिती यावेळी 28.1 षटकात 3 बाद 82 अशी होती. सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज उनादकटने बांगलादेशला आणखी एक धक्का दिला. मुशफिकुर रहीमला त्याने बाहेर जाणाऱया चेंडूवर पंतकरवी झेलबाद केले. रहीमने 46 चेंडूत 5 चौकारासह 26 धावा जमवल्या. मोमिनुल हक आणि रहीम यांनी चौथ्या गडय़ासाठी 38 धावांची भर घातली. 2010 डिसेंबरमध्ये उनादकटने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले होते. उनादकटला त्यानंतर 12 वर्षे संघात स्थान मिळवण्यासाठी वाट पहावी लागली.
लिटॉन दास आणि मोमिनुल हक या जोडीने संघाचा डाव सावरताना पाचव्या गडय़ासाठी 42 धावांची भर घातली. दासने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीवर भर दिला होता. अश्विनच्या गोलंदाजीवर दास राहुलकरवी झेलबाद झाला. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 25 धावा जमवल्या. मोमिनुल हकने तब्बल चार तास खेळपट्टीवर राहून 157 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह 84 धावा झळकवल्या. दास बाद झाला त्यावेळी बांगलादेशने 5 बाद 172 धावापर्यंत मजल मारली होती. अश्विन आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे शेवटचे पाच फलंदाज केवळ 55 धावात बाद झाले. उमेश यादवने मेहदी हसन मिराजला (15) यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. उमेश यादवने यानंतर नुरुल हसन व तस्कीन अहमद यांना बाद केले. मोमिनुल हक शतक झळकवेल असे वाटत असताना अश्विनच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात पंतकरवी झेलबाद झाला. तो नवव्या गडय़ाच्या रुपात तंबूत परतला. अश्विनने खलिद अहमदला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. तैजुल इस्लाम 4 धावावर नाबाद राहिला. 73.5 षटकात बांगलादेशचा डाव 227 धावावर समाप्त झाला. उमेश यादवने 25 धावात 4 तर अश्विनने 71 धावात 4 तसेच उनादकटने 50 धावात 2 गडी बाद केले. अश्विन 450 बळींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असून त्याचे आता 447 बळी झाले आहेत.
कर्णधार राहुल आणि गिल यांनी पहिल्या दिवशीचा खेळ संपताना 8 षटकात बिनबाद 19 धावा जमवल्या. राहुल 3 तर गिल 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावावर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव 73.5 षटकात सर्वबाद 227 (मोमिनुल हक 84, नजमुल हुसेन 24, झाकीर हसन 15, शकीब अल हसन 16, मुशफिकुर रहीम 26, दास 25, मेहदी हसन मिराज 15, नुरुल हसन 6, उमेश यादव 4-25, रविचंद्रन अश्विन 4-71, उनादकट 2-50), भारत प. डाव षटकात बिनबाद 19 (राहुल खेळत आहे 3, गिल खेळत आहे 14).









