सोनिया गांधींच्या निकटवर्तीय सैयदा हमीद यांचे धक्कादायक वक्तव्य : आसाममधील घुसखोरांचा मुद्दा तापणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मनमोहन सिंह सरकारच्या काळात नियोजन आयोगाच्या सदस्य राहिलेल्या सैयदा हमीद यांनी भारतात राहण्याचा बांगलादेशींना अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे. बांगलादेशी देखील माणूस असून त्यांच्याकडून भारतात राहण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये कारण जग अत्यंत मोठे आहे, असे विचित्र विधान सैयदा हमी यांनी केले आहे. सैयदा हमी यांना सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. माणुसकीच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. हा आमच्या भूमी आणि ओळखीचा प्रश्न आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानात अल्पसंख्याक बौद्ध, ख्रिश्चन, हिंदू आणि शिखांवर अत्याचार होत आहेत. अशास्थितीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय असलेल्या सैयदा हमीद यांनी घुसखोरांचे समर्थन करू नये, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांना सुनावले आहे.
तर आसाम सरकारकडून शासकीय भूमीवर अवैध कब्जा केलेल्या लोकांना हटविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सैयदा हमीद यांनी ही टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण आणि हर्ष मंदर यासारख्या कथित कार्यकर्त्यांसोबत सैयदा हमीद यांनी राज्य सरकारवर मुस्लिमांना बांगलादेशी ठरवून त्यांना चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करण्याचा आरोप केला आहे. जर ते बांगलादेशी असतील तर यात गैर काय? बांगलादेशी देखील माणूस आहेत. जग इतके मोठे आहे की, बांगलादेशी येथे राहू शकतात. ते कुणाच्या अधिकारांवर गदा आणत आहेत हे म्हणणे अत्यंत वादग्रस्त असल्याचा दावा सैयदा हमीद यांनी केला आहे.
तर प्रशांत भूषण यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्यावर टीका करत त्यांच्यावर अराजक आणि अवैध कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप केला. राज्य सरकार नागरिकांना बांगलादेशात पाठवत असून अवैध स्वरुपात घरांना तोडत आहे. सरकार या कारवायांना सार्वजनिक चौकशीपासून लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.
कथित कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर सरकार
या मुद्द्यावर काँग्रेस आणि अन्य बुद्धिवंतांच्या भागीदारीमुळे राज्याच्या स्थिरतेला धक्का पोहोचू शकतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री शर्मा यांनी केले आहे. अशा लोकांमुळेच आसामची ओळख धोक्यात सापडली आहे. आम्ही बांगलादेशी घुसखोरांना थारा देणार नसल्याचे शर्मा यांनी म्हटले. स्थानिक समुदायांच्या किमतीवर निवडक भांडवलदारांना लाभ पोहोचविणे एका मोठ्या रणनीतिचा हिस्सा असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केला आहे.
एक बाजू
जर ते बांगलादेशी आहेत, तर यात चुकीचे काय? बांगलादेशी देखील माणूस आहेत. जग इतके मोठे आहे की बांगलादेशी येथे राहू शकतात. ते कुणाच्या अधिकारांना रोखत आहेत हे म्हणणे अत्यंत वादग्रस्त आहे.
सैयदा हमीद,
नियोजन आयोगाच्या माजी सदस्य
दुसरी बाजू
माणुसकीच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा आमच्या भूमी आणि ओळखीचा प्रश्नआहे. सैयदा हमीद या सोनिया गांधींच्या निकटवर्तीय असू शकतात, परंतु त्यांनी घुसखोरांचे समर्थन करू नये.
किरण रिजिजू, केंद्रीयमंत्री









