पंढरीच्या आषाढीला अगदी बांगला देशातील नागरिकपण येत असत
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : पंढरपूर येथील आषाढी वारी ही सर्वांची असते. म्हणजे अनेक विक्रेते, फेरीवाले देखील वारीसाठी आतुर असतात. पंढरीच्या आषाढीला देशातील जनता तर येतेच पण अगदी बांगला देशातील नागरिकपण येत असत. हे लोक वारीत हिंदी सिनेमातील रीळ पडद्यावर दाखवत आणि याला ठराविक तिकीट असे.
पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात (पी. टी. ग्राउंड) येथे अशी रीळ दाखवली जायची, यात कुठलाही सीन कुठेही असे म्हणजे राजेश खन्ना यांचा अपना देश, तर मध्येच अमिताभ बच्चन यांच्या डॉनमधील फाईट अशी कुठलीही रीळ असायची. त्याकाळी म्हणजे 1970 ते 80 च्या दशकात असे मनोरंजनाचे प्रकार जत्रेत असत.
कारण अजून व्हिडिओ आला नव्हता आणि लोकांना हिंदी सिनेमाची प्रचंड क्रेझ असायची. तेव्हा गावातील शेकडो मुलं वारीत चिरीमिरीचे व्यवसाय करून असे 10 ते 15 मिनिटांचे ट्रेलर बघायला जात. त्याचं थिएटर म्हणजे काय, तर एक छोटी पत्र्याची खोली. त्यात समोर एखादा पांढऱ्या धोतराचा तुकडा लावलेला असायचा, एक माणूस बाहेर तिकीट द्यायला उभा असायचा.
चार आणे, आठ आणे असे तिकीट असायचे. विशेष म्हणजे वारीला येणारे हजारो भाविक असे ट्रेलर बघायला जायचे. कारण बाहेर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, राजकुमार, सुनील दत्त असा तत्कालीन हिरेंचे पोस्टर्स झळकत. स्थानिक खोडकर पोरांना ही माणसं बांगला देशी आहेत हे ठाऊक असायचे अशी व्रात्य पोरं ट्रेलर संपला, की भारत माता की जय, असे मोठ्याने ओरडून पळ काढायची.
ही माणसं बांगला देशाची असल्याने भारताचा जयजयकार केला की त्यांना राग येईल, असे मुलांना वाटायचे. पण ही लोक पोट भरण्यासाठी येत, उघड्यावरच स्वयंपाक करायची. वारी झाली की गाशा गुंडाळून ते परत जात. पुढे मनोरंजनाचे प्रकार वाढल्याने असे चित्रपटाची रीळ दाखवणारी लोक यायचे बंद झालेत.








