पुणे / प्रतिनिधी :
आज संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही लाखो बांगलादेशी आहेत. राजकीय इच्छाशक्ती आणि कठोर अंमलबजावणी केल्यास बांगलादेशी घुसखोरीचा हा कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो, असे परखड मत ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’त ते पुण्यात बोलत होते. शंखनाद आणि वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला आरंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक संत स्वाती खाडये, मनीषा पाठक आणि कोकण, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक मनोज खाडये, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ निलेश लोणकर, हिंदू जनजागृती समितीच्या सातारा जिल्हा समन्वयक भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट, पराग गोखले,अधिवक्ता निलेश सांगोलकर, रवींद्र पडवळ इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज, ह.भ.प. सुभाष बडदे, विश्वहिंदू परिषदेचे महेंद्र देवी, श्री श्री रविशंकर प्रतिष्ठानचे शेखर मुंदडा, गोसेवा परिषदेचे राजेंद्र लुंकड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, भारताची साडेचार हजार किलोमीटरची सीमा बांगलादेशाशी जोडलेली आहे. सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये घुसखोरी करून ईशान्य भारत मुसलमान बहुल करण्याचे प्रयत्न भारताच्या स्वातंत्र्यापासून चालू आहेत. आसामचे स्वातंत्र्यसैनिक आणि पूर्व मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्डोलोई यांनी ईशान्य भारताचा प्रदेश पाकिस्तानला देण्याच्या विरोधात लढा उभा केला. त्यामुळे आज ईशान्य भारताची 7 राज्ये भारताचा भाग आहेत.








