खेड :
तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या मूळच्या बांग्लादेश येथील अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबणी, मूळ, पेडोली–बांग्लादेश) यास मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तो उदरनिर्वाहासाठी कळंबणी हद्दीतील आपेडेफाटा येथील हॉटेल स्वामीलीला जवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. याबाबत दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला कळंबणी येथून रंगेहाथ पकडण्यात आले. भारताच्या सरहद्दीवरील गस्तीपथकाची नजर चुकवत मुलखी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचा ठपका ठेवत त्यास अटक करण्यात आली. या बाबत दहशतवादविरोधी पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष शेलार यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. रत्नागिरीपाठोपाठ तालुक्यातील कळंबणी येथेही बांग्लादेशी नागरिक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.








