सावंतवाडी –
न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांतो सलीम सरकार (20) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीम. गोवेकर यांनी न्यायालयात मांडलेली बाजू , आरोपी याने गुन्ह्याची दिलेली कबुली विचारात घेत न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश आर .जी .कुंभार यांनी आरोपीला एक महिना सश्रम कारावासाच्या शिक्षेचा आदेश दिला. काही महिन्यांपूर्वी बांदा भागात विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 3 ऑगस्ट 2024 रोजी संशयित मोहम्मद सरकारसह सहाहीजणांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयाच्या सुनावणीस हजर करण्यात आले होते. न्यायालयाने यापैकी दोघांना निर्दोष मुक्त करून अन्य चौघांना शिक्षा सुनावली होती. दरम्यान सहाही संशयितांना पोलिसांनी कायदेशीर रखवालीत न्यायालयाच्या परिसरात आणले. त्यातील शिक्षा सुनावलेला आरोपी मोहम्मद सरकार (20) याने आपणास शौचास जायचे आहे असे सांगितल्याने शौचालयाच्या इमारतीतील शौचखोलीत सोडले. हीच संधी साधत आरोपीने शौचालयाच्या खिडकीतून बाहेर उडी टाकून त्यानंतर कठड्यावरून रस्त्यावर उडी टाकत पलायन केले होते. तात्काळ पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असता इन्सुली तपासणी नाका येथे पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी बांदा पोलिसांनी आरोपी मोहम्मद सरकार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.









