लंकेचा 8 गड्यांनी पराभव, लिटन दास ‘मालिकावीर’, मेहदी हसन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/कोलंबो
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशने यजमान लंकेचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने 21 चेंडू बाकी ठेवून लंकेवर 8 गड्यांनी विजय मिळविला. या मालिकेतील हा निर्णायक सामना होता. बांगलादेशच्या लिटन दासला ‘मालिकावीर’ तर मेहदी हसनला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रेहमानने टी-20 प्रकारात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळविले.
या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. लंकेने 20 षटकात 7 बाद 132 धावा जमविल्यानंतर बांगलादेशने 16.3 षटकात 2 बाद 133 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली. लंकेच्या डावामध्ये सलामीच्या निशांकाने 39 चेंडूत 4 चौकारांसह 46, कमिंदु मेंडीसने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 21, शनाकाने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 35 धावा जमविल्या. लंकेच्या केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. लंकेच्या डावामध्ये 3 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 40 धावा जमविताना तीन गडी गमविले. लंकेचे अर्धशतक 47 चेंडूत तर शतक 94 चेंडूत पूर्ण झाले.
संक्षिप्त धालफलक
लंका 20 षटकात 7 बाद 132 (पी. निशांका 46, कमिंदु मेंडीस 21, डी. शनाका 35, अवांतर 4, मेहदी हसन 4-11, एस. इस्लाम, मुस्तफिजुर रेहमान व शमीम हुसेन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 16.3 षटकात 2 बाद 133 (टी. हसन नाबाद 73, लिटन दास 32, टी. रिदॉय नाबाद 27, अवांतर 1, तुषारा व कमिंदु मेंडीस प्रत्येकी 1 बळी)









