अफगाणचा सहा गड्यांनी पराभव : मेहदी हसन मिराज सामनावीर
वृत्तसंस्था/ धर्मशाला
2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने अफगाणचा 6 गड्यांनी पराभव केला. बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराजने अर्धशतक तसेच 3 गडी बाद केल्याने त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणचा डाव 37.2 षटकात 156 धावात आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 34.4 षटकात 4 बाद 158 धावा जमवित विजय नोंदविला.
अफगाणच्या डावात सलामीच्या गुरबाजने 62 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 47, ओमरझाईने 20 चेंडूत 4 चौकारांसह 22, इब्राहिम झेद्रानने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22, रहेमत शहाने 1 चौकारासह 18 तर कर्णधार शाहिदीने 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात 2 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शकीब अल हसनने 30 धावात 3, मेहदी हसन मिराजने 25 धावात 3, एस. इस्लामने 34 धावात 2 तसेच तस्किन अहमद व मुस्ताफिजुर रेहमानने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची सलामीची जोडी केवळ 27 धावात तंबूत परतली. सलामीचा हसन 5 धावावर धावचीत झाला तर अफगाणच्या फरुकीने दासचा त्रिफळा उडविला. त्याने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. नजमुल हुसेन शांतो व मेहदी हसन मिराज यांनी तिसऱ्या गड्यासाठी 97 धावांची भागिदारी केली. मेहदी हसन मिराजने 73 चेंडूत 5 चौकारांसह 57 धावा जमविल्या. नजमुल हुसेन शांतोने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 83 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 59 धावा जमविल्या. कर्णधार शकिब अल हसनने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकारा नोंदविले गेले. अफगाणतर्फे फरुकी, नवीन ऊल हक आणि ओमरझाई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : अफगाण 37.2 षटकात सर्व बाद 156 (गुरबाज 47, इब्राहिम झेद्रान 22, ओमरझाई 22, रेहमत शहा 18, शाहिदी 18, शकिब अल हसन 3-30, मेहदी हसन मिराज 3-25, एस. इस्लाम 2-34, तस्किन अहमद 1-32, मुस्ताफिजुर रेहमान 1-34), बांगलादेश 34.4 षटकात 4 बाद 158 (टी. हसन 5, लिटॉन दास 13, मेहदी हसन मिराज 57, नजमुल हुसेन शांतो नाबाद 59, शकिब अल हसन 14, रहिम नाबाद 2, अवांतर 8, फरुकी, नवीन ऊल हक, ओमरझाई प्रत्येकी 1 बळी).









