आशिया चषक क्रिकेट : मेहंदी हसन, नजमूल शांतोची वादळी शतके
वृत्तसंस्था/ लाहोर (पाकिस्तान)
येथे सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत मेहंदी हसन मिराज (112) व नजमूल शांतो (104) यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 335 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात मेहंदी हसन मिराज आणि नजमूल हुसैन शांतो यांनी बांगलादेशसाठी धमाकेदार खेळी केली. या दोघांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे बागंलादेशने 50 षटकात 5 बाद 334 धावां केल्या.
प्रारंभी, बांगलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मोहम्मद नईमला 28 धावांवर मुजीब रेहमानने बाद केले. यानंतर तौहीदलाही गुलाबदिन नईमने भोपळाही फोडू दिला नाही. मेहंदी हसन मिराज तब्बल पाच वर्षांनंतर बांगलादेशसाठी वनडे सामन्यात सलामीवीर म्हणून खेळला. यापूर्वी 2018 साली आशिया चषकमध्ये त्याने सलामीवीर म्हणून खेळी केली होती. यानंतर पाच वर्षात एकदाही वनडे क्रिकेटमध्ये त्याला सहाव्या क्रमांकाच्या आधी संधी मिळाली नव्हती. मात्र, रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध त्याने मिळालेल्या या संधीचे सोने केले. 119 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 112 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्याला नजमूल शांतोने चांगली साथ दिली. नजमूलने 105 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह 104 धावा कुटल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 194 धावांची विक्रमी भागीदारी केली. विशेष म्हणजे, आशिया चषकातील बांगलादेशकडून झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांच्या शानदार शतकी खेळीमुळे बांगलादेशने 50 षटकांत 5 गडी गमावत 334 धावा केल्या. दरम्यान, मुशफिकूर रहीम (25), शकीब अल हसनने (नाबाद 32) धावा केल्या तर शमीम हुसेन देखील 11 धावा करून धावबाद झाला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकांत 5 बाद 334 (मेहंदी हसन मिराज 112, नजमूल शांतो 104, मोहम्मद नईम 28, शकीब अल हसन नाबाद 32, मुशफिकुर रहीम 25, मुजबीर रहीम व गुलाबदिन नईम प्रत्येकी एक बळी).









