पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे, नईम हसनचे पाच बळी
वृत्तसंस्था / गॅले
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने यजमान लंकेवर पहिल्या डावात 10 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नईम हसनने 121 धावांत 5 गडी बाद केले. लंकेचा पहिला डाव 485 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या डावात 57 षटकात 3 बाद 177 धावा जमवित लंकेवर एकूण 187 धावांची बढत मिळविली आहे.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना आता अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर लंकेने चोख प्रत्युत्तर दिले. लंकेने 4 बाद 368 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित सहा गडी 117 धावांची भर घालत तंबूत परतले. लंकेच्या डावामध्ये सलामीच्या निशांकाने 1 षटकार आणि 23 चौकारांसह 256 चेंडूत 187 धावा झळकविल्या. दिनेश चंडीमलने 119 चेंडूत 4 चौकारासह 54 धावा तसेच कमिंदु मेंडीसने 148 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 87 धावा जमविल्या. कर्णधार धनंजय डिसिल्वाने 2 चौकारांसह 19 तर मिलन रत्ननायकेने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 39 धावा केल्या.
शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत लंकेने 124 षटकाअखेर 6 बाद 465 धावांपर्यंत मजल मारली होती. मेंडीस आणि रत्ननायके यांनी सातव्या गड्यासाठी 84 धावांची भागिदारी केली. मात्र उपाहारानंतर लंकेचे शेवटचे चार गडी झटपट बाद झाले. लंकेचा पहिला डाव 131.2 षटकात 485 धावांवर आटोपला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नईम हसनने 121 धावांत 5 तर हसन मेहमुदने 74 धावांत 3 तसेच ताजुल इस्लाम आणि मोमिनुल हक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची नईमची ही चौथी वेळ आहे.
दहा धावांची पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावाला सुरूवात केली आणि चहापानापर्यंत 22 षटकात 2 बाद 65 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या जयसूर्याने बांगलादेशचा सलामीचा फलंदाज अनामुल हकला 4 धावांवर केले. टी. रत्ननायकेने मोमिनुल हकचा बळी मिळविला. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये बांगलादेशने आणखी एक गडी गमविताना 112 धावांची भर घातली. शदमान इस्लामने 126 चेंडूत 7 चौकारांसह 76 धावा जमविताना कर्णधार शांतोसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भर घातली. शदमान इस्लाम बाद झाल्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांनी दिवसअखेर संघाची पडझड होऊ दिली नाही. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 49 धावांची भागिदारी केली. कर्णधार शांतो 6 चौकारांसह 56 तर रहीम 2 चौकारांसह 22 धावांवर खेळत आहेत. लंकेतर्फे प्रभात जयसूर्या, मिलन रत्ननायके आणि टी. रत्ननायके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश प. डाव 153.4 षटकात सर्वबाद 495, लंका प. डाव 131.2 षटकात सर्वबाद 485 (पी. निशांका 187, चंडीमल 54, मॅथ्यु 39, उदारा 29, कमिंदु मेंडीस 87, मिलन रत्ननायके 39, अवांतर 11, नईम हसन 5-121, हसन मेहमुद 3-74, ताजुल इस्लाम आणि मोमिनुल हक प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश दु. डाव 57 षटकात 3 बाद 177 (शदमान इस्लाम 76, अनामुल हक 4, नजमुल हुसेन शांतो खेळत आहे 56, मुश्फिकुर रहीम खेळत आहे 22, अवांतर 22, प्रभात जयसूर्या, मिलन रत्ननायके आणि टी. रत्ननायके प्रत्येकी 1 बळी).









