शेवटच्या षटकात हाराकिरीने सामना टाय : मालिका 1-1 बरोबरीत : हरलीन देओल सामनावीर
वृत्तसंस्था/ मिरपूर
भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांतील तिसरा व शेवटचा वनडे सामना चांगलाच रोमांचक झाला. शेवटच्या 9 षटकात भारताला विजयासाठी 34 धावा हव्या होत्या आणि संघाकडे पाच विकेट्स देखील होत्या. पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत सामना भारताला पराभूत केले. विजयासाठी एक धाव कमी असताना मेघना सिंगने विकेट गमावली आणि भारतीय संघ सर्वबाद झाला. परिणामी मिरपूरमध्ये खेळला गेलेला हा तिसरा वनडे सामना बरोबरीत सुटला. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता.
उभय संघांतील या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारीत 50 षटकांमध्ये बांगलादेशने 4 बाद 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.3 षटकांत 225 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात भारताला तीन धावा हव्या होत्या. पण षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारुफा अख्तरने मेघना सिंगला यष्टीरक्षक निगर सुलतानच्या हाती झेलबाद केले. भारतीय संघाची ही शेवटची विकेट होती. परिणामी संघ विजयापासून अवघ्या एका धावेच्या अंतरावर सर्वबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला.
फरगाना हकचे शानदार शतक
बांगलादेश महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात चार गडी गमावत 225 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून फरगाना हकने शतकी खेळी केली. तिने 160 चेंडूचा सामना करताना सात चौकाराच्या मदतीने 107 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, महिला वनडेमध्ये एक हजार पेक्षा जास्त धावा करणारी फरगाना हक ही एकमेव बांगलादेशी फलंदाज आहे. तिच्या शतकामुळेच निर्णायक सामन्यात बांगलादेशला 4 बाद 225 धावा करता आल्या. तसेच बांगलादेशची ही एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय, शमिमा सुलतानाने 78 चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने 52 धावांचे योगदान दिले. कर्णधार निगार सुलतानाने 24 धावा जोडल्या. तर शोबनाने 22 चेंडूत नाबाद 23 धावांचे योगदान दिले. भारताकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर देविका वैद्यला एक विकेट मिळाली.
स्मृती, हरलीनची अर्धशतके तरीही सामना टाय
बांगलादेश महिला संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया स्वस्तात तंबूत परतल्या. शेफालीला 4 तर यास्तिकाला 5 धावा करता आल्या. हरलीन देओल आणि स्मृती मानधना यांनी भारताचा डाव सावरला. स्मृतीने 59 धावांची दमदार खेळी केली. यामध्ये पाच चौकार लगावले. तर हरलीन देओलने 9 चौकाराच्या मदतीने 77 धावांची दमदार खेळी केली. याशिवाय, जेमिमा रॉड्रिग्सने 33 धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौर 14 धावांचे योगदान देऊ शकली. एकेकाळी टीम इंडियाचा स्कोर 6 बाद 192 असा होता. त्यामुळे टीम इंडिया सहज विजय मिळवेल असे वाटत होते, पण यानंतर संघाच्या सलग 4 विकेट पडल्या आणि सामना बरोबरीत राहिला. भारताने शेवटच्या 6 विकेट अवघ्या 34 धावांत गमावल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या 3 धावा हव्या होत्या. मैदानात जेमिमा आणि मेघना सिंग होत्या. पहिल्या दोन चेंडूवर दोघींनी एक-एक सिंगल घेतली पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंग झेलबाद झाली आणि भारताने हातातला सामना गमावला. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर मारुफा अख्तरने दोन फलंदाजांना तंबूत धाडले.









