पहिली कसोटी दुसरा दिवस ः कुलदीप यादव, सिराजची भेदक गोलंदाजी, अश्विनचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम
येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी गुरुवारी भारताने पहिल्या डावात 404 धावा जमविल्यानंतर कुलदीप यादव व सिराज यांच्या भेदक माऱयासमोर बांगलादेशची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. दिवसअखेर त्यांनी 8 बाद 133 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये रविचंद्रन अश्विनने अर्धशतक झळकविले. या कसोटीवर भारताने आपली पकड अधिकच मजबूत करताना 271 धावांची बढत मिळविली आहे. भारताच्या डावामध्ये तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले.

या कसोटीत भारताने 6 बाद 278 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. 82 धावांवर नाबाद राहिलेला श्रेयस अय्यर आपल्या धावसंख्येत केवळ 4 धावांची भर घालून तंबूत परतला. इबादत हुसेनने त्याचा त्रिफळा उडविला. अय्यरने 10 चौकारांसह 86 धावा जमविल्या. अय्यर बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव या जोडीने आक्रमक फटकेबाजी करत आठव्या गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी केल्याने भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांविरुद्ध दडपण न घेता फलंदाजी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कुलदीप यादवने 22 धावांच्या सरासरीने 1 शतक आणि 6 अर्धशतके नोंदविली आहेत. पण कसोटीत त्याने गुरुवारी 114 चेंडूत 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 5 शतके झळकविली असून त्यापैकी 4 शतके त्याने विंडीजविरुद्ध नोंदविली आहेत. अश्विनने बांगलादेशविरुद्ध कसोटीतील आपले 13 वे अर्धशतक झळकविले. त्याने 113 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 58 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराजने अश्विनला यष्टीरक्षककरवी यष्टीचीत केले. अश्विन बाद झाल्यानंतर कुलदीप यादवही अधिक वेळ मैदानात राहू शकला नाही. उमेश यादवने 10 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 15 धावा फटकावल्या. मोहम्मद सिराज 4 धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव 133.5 षटकात 404 धावांवर आटोपला. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लामने 133 धावात 4 तर मेहदी हसन मिराजने 112 धावात 4 तसेच इबादत हुसेन आणि खलिद अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावातील 112 व्या षटकात रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव ही जोडी फलंदाजी करत असताना भारताला 5 पेनल्टी धावा मिळाल्या. तैजुल इस्लामच्या या षटकात बांगलादेशकडून क्षेत्ररक्षणात चूक झाल्याने भारताला या 5 धावा मिळाल्या.

बांगलादेशच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. नवा चेंडू हाताळणाऱया मोहम्मद सिराजने सलामीच्या नजमुल हुसेन शांतोला खाते उघडण्यापूर्वीच यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. सिराजच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मोहम्मद शमी आणि बुमराह यांच्या गैरहजेरीत सिराज आणि उमेश यादव यांनी नवा चेंडू चांगलाच हाताळला. बांगलादेशच्या डावातील चौथ्या षटकात उमेश यादवने यासीर अलीचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. आत येणाऱया चेंडूवर फटका मारण्याच्या नादात यासीर अली बाद झाला. बांगलादेशची स्थिती यावेळी 2 बाद 5 अशी होती.
लिटॉन दास आणि रहीम या जोडीने भारताच्या गोलंदाजीसमोर सावधपणे फलंदाजी केली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 34 धावांची भर घातली. सिराजने दासचा इनस्विंगरवर त्रिफळा उडविला. दासने 30 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. सिराजने बांगलादेशला आणखी एक धक्का दिला. सलामीचा फलंदाज झकीर हसनला त्याने पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. हसनने 45 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन कुलदीप यादवच्या फिरकीवर सपशेल फसला. कर्णधार के. एल. राहुलने कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन या जोडीकडे चेंडू सोपविला. कुलदीपने हसनला कोहलीकरवी झेलबाद केले. त्याने 3 धावा जमविल्या. कुलदीपने त्यानंतर नुरुल हसनला झेलबाद केले. गिलने हसनचा अप्रतिम झेल टिपला. त्याने 22 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. मुश्फीकुर रहीमने एकेरी आणि दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला होता. पण कुलदीप यादवच्या अधिक वळलेल्या चेंडूवर तो पायचीत झाला. रहीमने 58 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. कुलदीप यादवने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर तैजुल इस्लामचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. बांगलादेशची यावेळी स्थिती 35 षटकात 8 बाद 102 अशी केविलवाणी झाली होती. मेहदी हसन मिराज आणि इबादत हुसेन या जोडीने 9 षटकांचा खेळ खेळून काढताना 31 धावांची अभेद्य भागीदारी केली. मेहदी हसन 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 तर इबादत हुसेन 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे सिराजने 14 धावात 3, कुलदीप यादवने 33 धावात 4 तर उमेश यादवने 33 धावात 1 गडी बाद केला. रविचंद्रन अश्विनची गोलंदाजी अचूक होती, पण त्याला गडी बाद करता आला नाही. भारताचा कुलदीप यादव तब्बल 22 महिन्यांनंतर पहिली कसोटी खेळत होता. कुलदीपचा 28 वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला होता. डावखुऱया कुलदीपने नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कसोटीतील आपली सर्वोच्च 40 ही धावसंख्या नोंदविली. तसेच त्याने गोलंदाजीतही 33 धावात 4 गडी बाद केले आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत प. डाव 133.5 षटकात सर्वबाद 404 (राहुल 22, गिल 20, पुजारा 90, कोहली 1, पंत 46, अय्यर 86, अक्षर पटेल 14, रविचंद्रन अश्विन 58, कुलदीप यादव 40, उमेश यादव नाबाद 15, सिराज 4, तैजुल इस्लाम 4-133, मेहदी हसन मिराज 4-112, खलिद अहमद 1-43, इबादत हुसेन 1-70), बांगलादेश प. डाव 44 षटकात 8 बाद 133 (नजमुल हुसेन 0, झकीर हसन 20, यासीर अली 4, दास 24, रहीम 28, शकीब अल हसन 3, नुरुल हसन 16, मेहदी हसन मिराज खेळत आहे 16, टी. इस्लाम 0, इबादत हुसेन खेळत आहे 13, कुलदीप यादव 4-33, सिराज 3-14, उमेश यादव 1-33).









