उच्चायुक्तालयात तोडफोड झाल्यानंतर घडामोडींना वेग : ढाका येथे भारतीय उत्पादनांवर बहिष्कार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या युनूस सरकारने कोलकाता आणि त्रिपुरातून आपल्या दोन राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. 2 डिसेंबर रोजी आगरतळा येथील बांगलादेशी उच्चायुक्तालयात तोडफोड झाली होती. तसेच कोलकाता येथील उप उच्चायुक्तालयाबाहेरही निदर्शने करण्यात आल्यानंतर बांगलादेशने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, आगरतळा-कोलकाता घटनेच्या प्रत्युत्तरात बांगलादेशातही निदर्शने होत आहेत. गुरुवारी बांगलादेशी नेत्यांनी ढाका येथे भारतीय साड्या जाळून भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
भारतातील तोडफोडीच्या घटनांमुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 3 डिसेंबर रोजी राजदुतांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुक्रवारी ही माहिती समोर आली आहे. या दोन्ही राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतात परत कधी पाठवले जाईल, हे बांगलादेश सरकारने अद्याप सांगितलेले नाही. तसेच आगरतळा उच्चायुक्तालय पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही दुतावास अधिकारी भारतातील बांगलादेशविरोधातील निदर्शनांच्या स्थितीचा अहवाल सादर करतील.
कोलकाता येथील बांगलादेशचे कार्यवाहक उपउच्चायुक्त मोहम्मद अशरफुर रहमान ढाका येथे पोहोचले आहेत. बांगलादेश सरकारचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांचीही त्यांनी भेट घेतली. अशरफुर यांनी तौहीद यांना आगरतळा येथील हल्ला आणि ताज्या परिस्थितीची माहिती दिली. त्रिपुराचे बांगलादेशी साहाय्यक उच्चायुक्त आरिफ मोहम्मद यांनाही परत बोलावण्यात आले असले तरी ते शुक्रवारपर्यंत ढाका येथे पोहोचलेले नव्हते.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2 डिसेंबरला आगरतळा येथील उच्चायुक्तालयात बांगलादेशी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप दोन्ही राजदुतांनी केला आहे. त्यांनी कार्यालय परिसरावरही हल्ला केला. 3 डिसेंबर रोजी बांगलादेशने उच्चायुक्तालय बंद केले. बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान तोडफोड करण्यात आली होती. 2 डिसेंबर रोजी चिन्मय प्रभू यांच्या अटकेच्या निषेधार्थ अनेकांनी बांगलादेशी दुतावास कार्यालयाबाहेर रॅली काढली. याचदरम्यान, आगरतळा येथील बांगलादेश साहाय्यक उच्चायुक्तालयाच्या आवारात 50 हून अधिक आंदोलक घुसले होते. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला होता.









