रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठविण्यावर होणार चर्चा
@ वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सप्टेंबर महिन्यात भारत दौऱयावर येणार आहेत. भारत दौऱयादम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान रोहिंग्यांच्या मुद्दय़ावर चर्चा करणार आहेत. रोहिंग्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याचा मुद्दा दौऱयाच्या केंद्रस्थानी असणार आहे. बांगलादेशचे विदेश सचिव मसूद बिन मोमेन यांनी बुधवारी यासंबंध्घ माहिती दिली आहे. पंतप्रधान हसीना या म्यानमारमधून बांगलादेशात आलेल्या रोहिंग्या शरणार्थींद्वारे होणाऱया अमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दाही उपस्थित करणार आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत दौऱयाचे निमंत्रण दिले आहे. रोहिंग्यांना त्यांच्या राखिन प्रांतात परत पाठविणे हाच आमच्यासाठी एकमात्र सुविधाजनक तोडगा आहे. रोहिंग्यांना परत पाठविण्यात भारत कशाप्रकारे मदत करणार यावर शेख हसीना आणि मोदी यांच्यात चर्चा होऊ शकते. 25 ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रोहिंग्या म्यानमारमधून बाहेर पडत बांगलादेशात पोहोचले असल्याची माहिती मोमेन यांनी दिली आहे.
रोहिंग्या मुस्लीम बांगलादेशात सामाजिक समस्या निर्माण करत आहेत. रोहिंग्यांचा अमली पदार्थ तसेच महिलांच्या तस्करीत समावेश असल्याचे पंतप्रधान हसीना यांनी मागील आठवडय़ात म्हटले होते. 11 लाखांहून अधिक रोहिंग्या दीर्घकाळापासून समस्या निर्माण करत आहेत. बांगलादेशने एक लाख रोहिंग्या शरणार्थींना उत्तम सुविधा आणि आश्रयस्थान पुरविले असल्याचे हसीना यांनी सांगितले होते.