वृत्तसंस्था / राजगीर (बिहार)
येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी ब गटातील सामन्यात बांगलादेशने चीन तैपेईचा 8-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. तर दुसऱ्या एका सामन्यात मलेशियाने विद्यमान विजेत्या कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाला मलेशियाकडून 1-4 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल, असे वाटत होते. पण शनिवारच्या सामन्यात चीन तैपेईला पराभूत केल्याने बांगलादेशचे आव्हान जिवंत राहिले आहे. या स्पर्धेतील चीन तैपेईचा हा सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या कोरियाने चीन तैपेईचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला होता.
बांगलादेश आणि चीन तैपेई यांच्यातील शनिवारच्या सामन्यात बांगलादेशने शेवटच्या दोन 15 मिनिटांच्या कालावधीतील सत्रामध्ये 5 गोल नोंदविले. बांगलादेशच्या मोहम्मद अब्दुल्लाने चौथ्या आणि 26 व्या मिनिटाला, रकीबुल हसनने 42 व 43 व्या मिनिटाला, अश्रफुल इस्लामने 45 व्या आणि 58 व्या मिनिटाला असे गोल केले. सोहानुर सोबुचीने 36 व्या मिनिटाला तसेच रेझाउल बाबूने 56 व्या मिनिटाला गोल नोंदविले. चीन तैपेई संघातर्फे तेसुंग हेसने 10 व्या आणि 18 व्या मिनिटाला असे दोन गोल तर तेसुंग शी याने 60 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. आता या स्पर्धेत बांगलादेशचा ब गटातील शेवटचा सामना विद्यमान विजेत्या कोरियाबरोबर सोमवार 1 सप्टेंबर रोजी खेळविला जाईल तर चीन तैपेई आणि मलेशिया यांच्यातील सामना येत्या सोमवारी होईल.
कोरियाला पराभवचा धक्का
ब गटातील शनिवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात मलेशियाने विद्यमान विजेत्या कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. आतापर्यंत पाचवेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या कोरियाने दुसऱ्याच मिनिटाला जीनच्या मैदानी गोलवर आपले खाते उघडले. त्यानंतर अखिमुल्ला अनुराने 29 व्या, 34 व्या आणि 58 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधताना मलेशियाला आघाडीवर नेले. मलेशियाचा चौथा गोल असरान हमसेनीने केला.
सामन्यांचे निकाल
बांगलादेश- चीन तैपेई
8 3
मलेशिया- कोरिया
4 1
भारताचा सामना जपानशी
या स्पर्धेत रविवारी यजमान भारताचा अ गटातील दुसरा सामना जपानबरोबर होत आहे. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चीनचा 4-3 अशा गोलफरकाने निसटता पराभव करुन विजयी सलामी दिली होती. रविवारच्या सामन्यात भारतीय संघ मोठ्या फरकाने विजयी मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. या स्पर्धेत भारताला मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे. राजगीरमधील ही स्पर्धा जिंकणारा संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. मात्र रविवारच्या सामन्यात जपान संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही, अशी अपेक्षा आहे. रविवारी चीनचा दुसरा सामना कझाकस्तानबरोबर होईल.









