न्यूझीलंड वि बांगलादेश दुसरी कसोटी, तिसरा दिवस : न्यूझीलंडच्या पहिला डाव 180 धावांवर आटोपला
वृत्तसंस्था/ ढाका
येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 180 धावांवर आटोपला. अवघ्या आठ धावांची नाममात्र आघाडी किवीज संघाला मिळाली. यजमान बांगलादेशकडून दुसऱ्या डावात दमदार कामगिरीची अपेक्षा होती पण तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 8 षटकांत 2 गडी गमावत 38 धावा केल्या होत्या. यजमान संघाकडे 30 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस झाकीर हसन 16 व मोमीनल हक 0 धावांवर खेळत होते.
दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला पहिल्या दिवशी सर्वबाद 172 धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची स्थिती आणखी वाईट असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 55 धावा होत्या. दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. यामुळे तिसऱ्या दिवशी सामन्याला सुरुवात झाली आणि 37.1 षटकांत 180 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला.8 धावांची नाममात्र आघाडी न्यूझीलंडला मिळाली. किवीज संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 87 धावांची खेळी साकारली. कर्णधार साऊदीने 14 तर जेमिसनने 20 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज व तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
यजमान संघाला 30 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात खेळताना बांगलादेशची खराब सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसअखेरीस यजमान संघाने 2 गडी बाद 38 धावा केल्या आहेत आणि 30 धावांची आघाडी मिळवली आहे. सलामीवीर जॉय 2 धावा काढून तंबूत परतला तर पहिल्या सामन्यातील शतकवीर कर्णधार शांतोने केवळ 16 धावा केल्या. यानंतर दिवसअखेरीस झाकीर हसन व मोमीनल हक यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. किवीज संघाकडून एजाज पटेल व टीम साऊदी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान, चौथ्या दिवशीच या सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट होईल. पाऊस पडून गेल्याने ही खेळपट्टी गोलंदाजांना पूरक आहे. यामुळे दुसऱ्या डावात 200 च्या आसपास धावा झाल्या तरी त्या गाठणं न्यूझीलंडला कठीण जाईल. बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. यामुळे या दोन दिवसात काय घडते याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 172 व दुसरा डाव 8 षटकांत 2 बाद 38 (झाकीर हसन खेळत आहे 16, मोमीनल हक खेळत आहे 0, शांतो 16, जॉय 2, साऊदी व पटेल प्रत्येकी एक बळी)
न्यूझीलंड प.डाव 37.1 षटकांत सर्वबाद 180 (केन विल्यम्सन 13, मिचेल 18, ग्लेन फिलिप्स 87, काईल जेमिसन 20, टीम साऊदी 14, मेहदी हसन मिराज व तैजुल इस्लाम प्रत्येकी 3 बळी).









