वृत्तसंस्था/नवी दिल्ली
29 ऑगस्टपासून बिहार राज्यातील राजगीर येथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तान आणि ओमान या संघांच्या जागी बांगलादेश आणि कझाकस्तान सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
यापूर्वी या स्पर्धेसाठी पाक आणि ओमान संघांचा समावेश होता. सदर स्पर्धेत 8 संघांचा समावेश आहे. यजमान भारत, चीन, जपान आणि कझाकस्तान हे संघ अ गटात असून मलेशिया, कोरिया, चीन तैपेई आणि बांगलादेश यांचा ब गटात समावेश आहे. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी शेवटचा सामना यजमान भारत आणि चीन यांच्यात होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना तसेच तिसऱ्या स्थानासाठीचा सामना आणि पाचव्या व सहाव्या स्थानासाठीचे सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी पाकच्या हॉकीपटूंसाठी भारतीय शासनाने व्हिसा देण्याची तयारी दर्शविली होती. पण पाक हॉकी फेडरेशनने या स्पर्धेसाठी आपला संघ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतात पाठविण्यास नकार दिला. स्पर्धा आयोजकांना पाकच्या जागी बांगलादेशला बदली संघ म्हणून संधी देण्याचे निश्चित केले. 2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी राजगीरमधील पुरुषांची आशिया चषक हॉकी स्पर्धा ही पात्रतेची स्पर्धा म्हणून मानली जाते.









