वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा एकदिवसीय सामन्यांतील कर्णधार आणि त्यांचा महत्त्वाचा खेळाडू तमिम इक्बाल हा भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर त्याने आपल्याला पाठीचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या निवड समितीचे प्रमुख मिन्हाजुल आबेदिन यांनी सांगितले की, त्यांना तमिमच्या पाठीच्या दुखण्याची जाणीव आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतरच सदर 34 वर्षीय खेळाडूने आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्याला विश्वचषकासाठीच्या संघात स्थान न देण्याचा निर्णय हा त्याच्याशी बोलूनच घेण्यात आला आहे, असे आबेदिन यांनी सांगितले. तमिमला आशिया चषक स्पर्धाही दुखापतींमुळे हुकली होती आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले होते. त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 44 धावा काढल्या होत्या.









