टी-20 मालिका, परवेझ हुसेन इमॉन सामनावीर
वृत्तसंस्था/ मीरपूर
बांगलादेशच्या दौऱ्यावर गेलेल्या पाक क्रिकेट संघाला पहिल्याच सामन्यात यजमान संघाकडून हार पत्करावी लागली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकचा 27 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. नाबाद अर्धशतक झळकाविणाऱ्या परवेझ हुसेन इमॉनला सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आले.
या पहिल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचा डाव केवळ 19.3 षटकात 110 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 15.3 षटकात 3 बाद 112 धावा जमवित विजय नोंदविला.
पाकच्या डावामध्ये सलामीच्या फक्र झमानने 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 44, खुशदील शहाने 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, अब्बास आफ्रिदीने 24 चेंडूत 3 षटकारांसह 22 धावा जमविल्या. पाकच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकच्या डावात 5 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 22 धावांत 3, सुस्ताफिझूर रेहमानने 6 धावांत 2 तर मेहदी हसन मिराज आणि टी. हसन शकीब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकचे 3 फलंदाज धावचीत झाले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर पाकच्या सलमान मिर्झाने टी. हसनला केवळ एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर सलमान मिर्झाने कर्णधार लिटॉन दासला केवळ एका धावेवर बाद केले. बांगलादेशची स्थिती यावेळी 2 बाद 7 अशी केविलवाणी होती. त्यानंतर परवेज हुसेन इमॉन आणि रिदॉय या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 61 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. अब्बास आफ्रिदीने रिदॉयचा त्रिफळा उडविला. त्याने 37 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. परवेज हुसेन इमॉन आणि जाकर अली यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. इमॉनने 39 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 56 तर जाकर अलीने 10 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 15 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 7 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 38 धावा जमविताना 2 गडी गमाविले. इमॉनने 34 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 10 षटकाअखेर बांगलादेशने 2 बाद 64 धावा जमविल्या होत्या. पाकतर्फे सलमान मिर्झाने 2 तर अब्बास आफ्रिदीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाक 19.3 षटकात सर्वबाद 110 (फक्र झमान 44, खुशदील शहा 17, अब्बास आफ्रिदी 22, टी. अहमद 3-22, मुस्ताफिझूर रेहमान 2-6, मेहदी हसन मिराज व टी. हसन शकिब प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 15.3 षटकात 3 बाद 112 (परवेझ हुसेन इमॉन नाबाद 56, रिदॉय 36, जाकर अली नाबाद 15, सलमान मिर्झा 2-23, अब्बास आफ्रिदी 1-16).









