तन्झिद हसनचे अर्धशतक, मुस्तफिजूर रेहमानचे 3, सामनावीर नसूम अहमदचे 2 बळी
वृत्तसंस्था / अबुधाबी
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे ब गटातील झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने शेवटच्या चेंडूवर अफगाणचा केवळ 8 धावांनी पराभव करत सुपर-4 फेरीसाठी आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. बांगलादेशच्या तन्झिद हसनने शानदार अर्धशतक झळकविले तर मुस्तफिजुर रेहमानने 3 गडी बाद केले. 2 बळी टिपणाऱ्या नसूम अहमदला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 20 षटकात 146 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावामध्ये सैफ हसन आणि तन्झिद हसन या सलामीच्या जोडीने 40 चेंडूत 63 धावांची भागिदारी केली. सैफ हसनने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 30 तर तन्झिद हसनने 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. कर्णधार लिटन दास 9 धावांवर बाद झाला. रिदॉयने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 26, शमीम हुसेनने 11 चेंडूत 2 चौकारांसह 11, जाकेर अलीने 13 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12 तर नुरूल हसनने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे रशिद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 तर ओमरझाईने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावामध्ये सलामीच्या रेहमतउल्लाह गुरबाजने 31 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35, नईबने 14 चेंडूत 2 चौकारांसह 16, मोहम्मद नबीने 15 चेंडूत 1 षटकारासह 15, अझमतउल्लाह ओमरझाईने 16 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 30 धावा जमविल्या. कर्णधार रशिद खानने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 20 धावा जमविल्या. नूर अहमदने शेवटच्या षटकात संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. पण त्याने 9 चेंडूत 2 षटकारांसह 14 धावा जमवित तो शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात नुरूल हसनकरवी सीमारेषेवर झेलबाद झाल्याने अफगाणचे आव्हान संपुष्टात आले. अफगाणच्या डावात 9 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मुस्तफिजुर रेहमानने 28 धावांत 3 तर नसूम अहमद, तस्किन अहमद आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 5 बाद 154 (तन्झिद हसन 52, सैफ हसन 30, रिदॉय 26, शमीम हुसेन 11, जाकेर अली नाबाद 12, नुरूल हसन नाबाद 12, रशिद खान 2-26, नूर अहमद 2-23, ओमरझाई 1-19), अफगाण 20 षटकात सर्वबाद 146 (गुरबाज 35, नईब 16, नबी 15, ओमरझाई 30, रशिद खान 20, नूर अहमद 14, मुस्तफिजुर रेहमान 3-28, नसूम अहमद, तस्किन अहमद आणि रिशाद हुसेन प्रत्येकी 2 बळी).









