21 व्या शतकातील सर्वात मोठा कसोटी विजय : दोन्ही डावातील शतकवीर नजमूल शांतो सामनावीर
वृत्तसंस्था/ मिरपूर
येथे खेळवल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशने कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बांगलादेशने कसोटी फॉरमॅटमध्ये धावांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. यापूर्वी 1928 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला होता, त्यानंतर 1934 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला होता. 21 व्या शतकात मात्र बांगलादेशने अफगाणला नमवत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
प्रारंभी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने पहिल्या डावात 382 आणि दुसऱ्या डावात 4 बाद 425 धावा करून डाव घोषित केला व अफगाणिस्तानला विजयासाठी 662 धावांचे मोठे लक्ष्य दिले. बांगलादेशसाठी नजमुल शांतोने दोन्ही डावात शतके झळकावली. त्याने पहिल्या डावात 175 चेंडूत 146 धावा तर दुसऱ्या डावात 151 चेंडूत 124 धावा केल्या. बांगलादेशकडून मोईनुल हक हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. हकने पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात 145 चेंडूत 121 धावा करून नाबाद राहिला. याशिवाय, दुसऱ्या डावात लिटॉन दासने नाबाद 66 धावांची शानदार खेळी साकारली. यामुळे बांगलादेशने दुसरा डाव 425 धावांवर घोषित करत अफगाण संघाला मोठे विजयी लक्ष्य दिले.
अफगाणच्या फलंदाजांची हाराकिरी
अफगाणचा पहिला डाव 146 धावांत आटोपल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांच्याकडून प्रतिकार होईल, असे वाटत होते. पण बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर अफगाण फलंदाजांनी दुसऱ्या डावातही नांगी टाकली. रेहमत शाह (30), कर्णधार हशमतउल्लाह (13) व करीम जनत (18) वगळता इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांचा दुसरा डाव 33 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आला. विशेष म्हणजे, या एकमेव कसोटी अफगाणच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. बांगलादेशच्या तस्कीन अहमदने 4 तर शरिफूल इस्लामने 3 बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इबादत हुसेन आणि मेहंदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
बांगलादेश संघाने हा सामना 546 धावांनी जिंकला, जो कसोटी सामन्यातील धावांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर हा 21 व्या शतकातील सर्वात मोठा विजय आहे. बांगलादेशच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने अफगाणिस्तानला फॉलोऑन न होऊ देत दुसऱ्या डावात स्वत: खेळण्याचा निर्णय घेतला होता. जर त्याने हे केले नसते तर कदाचित हा विक्रम झाला नसता आणि बांगलादेशचा संघ हा सामना एका डावाने जिंकू शकला असता.
कसोटीतील सर्वात मोठा विजय (धावांनुसार)
675- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ब्रिस्बेन-1928)
562- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, (द ओव्हल- 1934)
546- बांगलागेश विरुद्ध अफगाणिस्तान, (मीरपूर-2023)
530 – ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका (1911)
492 – दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया (2018)









