संघ जाहीर : शकीब अल हसनकडे नेतृत्व : वेगवान गोलंदाज मेंहदी हसन मिराजचे दोन वर्षानंतर संघात पुनरागमन
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशने आशिया कपसाठी शनिवारी आपला संघ जाहीर केला आहे. शकीब अल हसनच्या नेतृत्वाखाली 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनकॅप्ड तनजीद तमीमचा संघात समावेश करण्यात आला. याचवेळी वेगवान गोलंदाज मेंहदी हसनचे दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघाची कमान शकीब अल हसनकडे सोपवली. शकीबकडे जबाबदारी सोपवल्यानंतर शनिवारी सकाळी आगामी आशिया चषकासाठी संघाचा 17 सदस्यीय संघही जाहीर केला. शकीबपूर्वी तमिम इक्बालला वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तो दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला आहे. तमिमने यापूर्वी 6 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, परंतु पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीनंतर त्याने आपला निर्णय बदलला होता. यानंतर अफगाणविरुद्ध मालिकेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची आशा असल्याचे बीसीबीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शकीब आता तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार आहे. 36 वर्षीय खेळाडूने यापूर्वी 2009 ते 2017 दरम्यान बांगलादेशचे 52 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. आशिया चषकासाठी निवड समितीने युवा व अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत संघ जाहीर केला असल्याचे दिसून येत आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक पाकिस्तान व श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. स्पर्धेत बांगलादेशचा सलामीचा सामना दि. 31 ऑगस्टरोजी श्रीलंकेविरुद्ध होईल.
आशिया चषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघ – शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, मेंहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, शोरफुल इस्लाम, शमीम हुसेन, आफिफ हुसैन, इबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.









