वृत्तसंस्था/ लाहोर
2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे बांगलादेश आणि अफगाण यांच्यात ब गटातील सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता प्रारंभ होईल. या सामन्यात बांगलादेशला स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. ब गटातील हा बांगलादेशचा दुसरा सामना आहे.
या स्पर्धेत लंकेविरुद्ध पल्लिकेली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हार पत्करावी लागली होती. या सामन्यात बांगलादेश संघाची फलंदाजी असमाधानकारक झाली होती आणि त्यांना केवळ 164 धावापर्यंत मजल मारता आली होती. पहिल्या सामन्यात कर्णधार शकीब अल हसन हा चांगली कामगिरी करू शकला नव्हता. बांगलादेश संघातील नजमुल हुसेन शांतोने लंकेविरुद्धच्या सामन्यात एकाकी लढत 89 धावांची खेळी केली होती. रविवारच्या सामन्यात कर्णधार शकीब अल हसन तसेच मोहमद नईम, मुशफीकर रहिम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, एस. इस्लाम यांच्या कामगिरीवरच बांगलादेशचे यश अवलंबून राहिल.
अफगाणचे नेतृत्व शाहिदीकडे सोपवण्यात आले आहे. अफगाण संघाने अलीकडेच पाकविरुद्धची वनडे मालिका एकतर्फी गमवली होती. पण गेल्या जून जुलै महिन्यात अफगाणने बांगलादेशचा वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी बांगलादेशला रविवारच्या सामन्यात संधी मिळाली आहे. अफगाण संघातील फलंदाज गुरुबाज हा चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्याच्या फलंदाजीत सातत्य दिसत आहे. पाक आणि बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने अलीकडेच शानदार शतके झळकवली आहेत. अफगाण संघातील अष्टपैलू रशिद खान रविवारच्या सामन्यात आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशला विजयापासून रोखण्यासाठी प्रयत्नशील राहिल. कर्णधार शाहिदी, इब्राहिम झेद्रान, गुरबाज, नजबुल झेद्रान मोहमद नबी हे अफगाण संघातील प्रमुख फलंदाज असून रशीद खान, फरुकी, मुजीफ आणि नूर अहमद हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून नाणेफेकीनंतरच दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू निश्चित करतील.









