दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज लढत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. सलग तीन विजय मिळविणारा बेंगळूरचा संघ शनिवारच्या सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. या सामन्यात रिषभ पंत आणि विराट कोहली आमनेसामने येतील.
शनिवारच्या सामन्यात बेंगळूर संघात हर्षल पटेलचा समावेश राहिल. सलग तीन सामने जिंकल्यानंतर बेंगळूर संघाला यापूर्वीच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून 23 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यामध्ये हर्षल पटेल खेळू शकला नव्हता. बहिणीचे निधन झाल्याने त्याला बायोबबल सोडावे लागले होते. पण तो आता या सामन्यासाठी उपलब्ध झाला आहे. कर्णधार डु प्लेसिसने शिवम दुबे आणि रॉबीन उथप्पा यांच्या फटकेबाजीला आळा घालण्यासाठी गोलंदाजीत पर्याय उपलब्ध केले होते. पण त्याला या डावपेचामध्ये यश मिळू शकले नाही. बेंगळूर संघातील हर्षल पटेल हा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 31 वर्षीय हरियाणाच्या हर्षल पटेलने 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 32 बळी मिळविले होते. टी-20 प्रकारामध्ये हर्षल पटेल हा उत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत हर्षल पटेलने 4 सामन्यातून 5.50 धावांच्या सरासरीने 6 गडी बाद केले आहेत. मोहम्मद सिराज, आकाश दीप, हसरंगा हे बेंगळूर संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. विराट कोहली, मॅक्सवेल, डु प्लेसिस, दिनेश कार्तिक यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहिल.
पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी शनिवारच्या सामन्यात सांघिक कामगिरीची आवश्यकता आहे. सलामीचा पृथ्वी शॉ चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्याने पाठोपाठ दोन अर्धशतके झळकविली आहेत. ऑस्टेलियाचा सलामीचा अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नरच्या आगमनामुळे दिल्ली संघाची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. आधीच्या सामन्यात आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता. दिल्ली संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आतापर्यंत या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करताना सर्वाधिक म्हणजे 10 गडी बाद केले आहेत तर खलिल अहमदने 3 सामन्यातून सात गडी बाद केले आहेत. दिल्ली संघाकडे गोलंदाजांची उणीव निश्चितच नाही. अष्टपैलू अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर आणि ललित यादव हे पर्यायी गोलंदाज आहेत. शनिवारी येथील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळविला जाणार असून आतापर्यंत या मैदानावर झालेल्या पाचपैकी चार सामन्यात दुसऱयांदा फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.









