हिंडलगा कारागृहात कैद्यासह अधिकाऱ्याचीही चौकशी
बेळगाव : बहुचर्चित बिटकॉईन प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीचे एक पथक बेळगावात आले आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याची चौकशी करून पथकातील अधिकाऱ्यांनी कारागृह विभागातील अधिकाऱ्यांच्या या प्रकरणात सहभागाविषयी माहिती घेतली आहे. या चौकशीने कारागृह विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मंगळवार दि. 9 जुलै रोजी सकाळी बेंगळूर येथील एसआयटीचे दोन अधिकारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आले होते. तब्बल तीन तास या अधिकाऱ्यांनी नागेंद्र नामक कैद्याची चौकशी केली असून बिटकॉईन प्रकरणासंबंधी त्याच्याकडून माहिती घेतली आहे. त्यानंतर रात्री या पथकातील अधिकारी बेंगळूरला रवाना झाले आहेत.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या नागेंद्र या कैद्याने 11 जून 2024 रोजी एसआयटीचे प्रमुख मनीष करबीकर यांना एक पत्र पाठवले होते. कारागृह विभागाचे सध्याचे डीआयजी टी. पी. शेष यांनी 29 मे रोजी चौकशीच्या निमित्ताने आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आहे. बिटकॉईन प्रकरणात कोणासमोर तरी आपल्या नावाची वाच्यता केलास तर परिस्थिती ठीक राहणार नाही, असे धमकावल्याचा आरोप केला होता.
राज्य मानव हक्क आयोगालाही नागेंद्रने हे पत्र पाठवले होते. मानव हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठवून डीआयजी टी. पी. शेष यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करावी, याबरोबरच परप्पन अग्रहार कारागृहातील वॉर्डन अशोक भागली, शशी शेखर, प्रेमा आदी नावांचाही उल्लेख आहे. या आरोपाची चौकशी करून 9 सप्टेंबरच्या आत आयोगाकडे अहवालपाठविण्याची सूचना करण्यात आली होती. नागेंद्र या कैद्याने लिहिलेले पत्र उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ माजली होती. आता बेंगळूर येथील एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी नागेंद्रची चौकशी केली असून चौकशीत त्याने कोणती माहिती दिली आहे, कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष व इतर अधिकाऱ्यांच्या सहभागाविषयी त्याने तोंड उघडले आहे का? आदी प्रश्नांची उत्तरे एसआयटीलाच द्यावी लागणार आहेत. या चौकशीने कारागृह विभागातील अधिकारी मात्र हबकून गेले आहेत.
कैद्याने केलेल्या आरोपांचा इन्कार
कैद्याने केलेल्या आरोपांचा मात्र डीआयजी टी. पी. शेष यांनी इन्कार केला असून बिटकॉईन प्रकरणातील श्रीकृष्ण ऊर्फ श्रीकी कोण, हेच आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे.









