आता प्राधिकरणाचे प्रशासन ; पाच नगरपालिकांची रचना : लवकरच निवडणुका
प्रतिनिधी/ बेंगळूर
बृहत् बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) आता इतिहासजमा झाली असून मंगळवारपासून ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर रचना करण्यात आलेल्या पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसंबंधी राज्य सरकारने नियम तयार करून अधिसूचना जारी केली आहे. डिसेंबरमध्ये पाच नगरपालिकांसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या बेंगळुरातील पाच नगरपालिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे. मंगळवारी बीबीएमपी रद्द झाली असून प्राधिकरणाचे प्रशासन सुरू झाले आहे. त्यानुसार बेंगळूर महापालिका कार्यालयातील नामफलक बदलण्यात आले आहेत. तत्पूर्वी ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण कक्षेतील नगरपालिकांसाठी घ्यावयाच्या निवडणुकांसंबंधी नियमांची रुपरेषा असणारी अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेत नगरपालिकांच्या वॉर्डांमध्ये निवडणूक लढविणाऱ्यांसाठी खर्चाची मर्यादा 5 लाखापर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान बोगस मतदानाच्या तक्रारी आल्यास कोणती पावले उचलावीत, यासंबंधी देखील तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेंगळूर महापालिकेतील आयएएस, आयपीएस संवर्गातील पदांचे नव्याने नेमण्यात आलेल्या ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण व पाच नगरपालिकांसाठी पुनर्वाटप करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
बँक खाती बंद करण्याचा आदेश
बृहत् बेंगळूर महानगरपालिकेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदलाचा भाग म्हणून सरकारने बीबीएमबी अधिकार क्षेत्रातील 291 बँक खाती टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा आदेश दिला आहे. नगरविकास खात्याने जारी केलेल्या या आदेशात ग्रेटर बेंगळूर प्रशासकीय कायदा-2024 अंतर्गत नव्या नगरपालिकांच्या स्थापनेची प्राथमिक तयारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
पाच नगरपालिकांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक
ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणांतर्गत स्थापन झालेल्या 5 नगरपालिकांच्या निवडणुकीबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. न्यायालयाने देखील त्याला संमती दिली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. 30 नोव्हेंबर रोजी वॉर्ड आरक्षण अधिसूचना जारी करण्यात येईल. त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील. निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. लवकरच मतदारयादी तयार होणार आहे.
पाच नगरपालिकांसाठी आयुक्तांची नेमणूक
राज्य सरकारने ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणांतर्गत घोषणा केलेल्या पाच पालिकांसाठी आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. बेंगळूर केंद्र नगरपालिका आयुक्तपदी आयएएस अधिकारी राजेंद्र चोळन, बेंगळूर पूर्व नगरपालिका आयुक्तपदी रमेश जी. एस., बेंगळूर उत्तर नगरपालिकेवर पोम्मळ सुनीलकुमार, बेंगळूर दक्षिण नगरपालिकेवर रमेश के. एन., बेंगळूर पश्चिम नगरपालिकेवर राजेंद्र के. व्ही. यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.









