वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे यजमान लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेजर्स बेंगळूर यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या सामन्यात बेंगळूर संघाला मधल्या फळीतील फलंदाजीची समस्या सुधारावी लागेल.

या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यात बेंगळूर संघातील विराट कोहली, डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या फलंदाजीत सातत्य दिसत असून आतापर्यंत या संघाच्या 8 सामन्यामध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक झाली आहे. या स्पर्धेतचा पहिला टप्पा संपुष्टात आला असून आता दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत असल्याने अनेक संघ आपल्या चुका सुधारून मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोहली, डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी आतापर्यंतच्या सामन्यात फलंदाजीत चांगल्या धावा जमवल्या असल्या तरी त्यांच्याकडून प्रत्येक सामन्यात अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. या संघातील महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक यांनाही आपली फलंदाजी सुधारावी लागेल. सोमवारी होणाऱ्या सामन्यात बेंगळूर संघाला आपल्या क्षेत्ररक्षणात खूपच सुधारणा करावी लागेल. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात बेंगळूर संघाकडून अनेक सोपे झेल सुटले गेले. त्यामध्ये कोहलीच्या गलथान क्षेत्ररक्षणाचाही समावेश आहे. नियमित कर्णधार डु प्लेसिस जखमी असल्याने तो कदाचित सोमवारच्या सामन्यातही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरेल तर कोहलीकडे संघाचे नेतृत्व राहिल. मोहमद सिराज याची गोलंदाजीतील कामगिरी बऱ्यापैकी झाली असली तरी त्याला संघातील इतर गोलंदाजाकडून साथ मिळणे जरुरीचे आहे. हर्षल पटेलला शेवटच्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी करावी लागेल.
के एल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने या स्पर्धेतील आपल्या गेल्या सामन्यात पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास निश्चित वाढला आहे. लखनौची फलंदाजी भक्कम असून मेयर्स, स्टोईनिस, पुरन, बदोनी यांच्याकडून आक्रमक फटकेबाजी यशस्वी ठरत आहे. सोमवारचा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने बेंगळूरच्या तुलनेत लखनौला अधिक प्रोत्साहन मिळेल. लखनौची खेळपट्टी दुसऱ्या सत्रामध्ये संथ होत असल्याने फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी करताना खूप अवघड जाते. दरम्यान अमित मिश्रा तसेच रवि बिस्नोई हे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतील. मार्क वूडच्या गैरहजेरीत अफगाणचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकवर गोलंदाजीची अधिक जबाबदारी राहिल. या संघातील आणखी एक गोलंदाज हा किफायतशीर ठरू शकलेला नाही. गेल्या सात सामन्यामध्ये आवेश खानने षटकामागे सर्वसाधारण 10 धावा दिलेल्या आहेत. लखनौ सुपरजायंट्सने या स्पर्धेत आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणासह तिसरे स्थान मिळवले आहे. तर रॉयल चॅलेजर्स बेंगळूरचा संघ 8 सामन्यातून 4 विजयासह 8 गुण घेत पाचव्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), मेयर्स, हुडा, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, पुरन, नवीन उल हक, बदोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, चरक, यश ठाकुर, शेफर्ड, मार्क वूड, स्वप्नील सिंग, व्होरा, सॅम्स, पी. मंकड, के. गौतम, जयदेव उनादकट, स्टोईनिस, बिश्नोई, मयांक यादव.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहमद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शहबाज अहमद, अनुज रावत, आकाशदीप, महिपाल लोमरोर, अॅलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड विली, वेन पार्नेल, हसरंगा, मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, विजयकुमार विशाख आणि मिचेल ब्रेसवेल.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता.









