वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात चुरशीच्या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून 81 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. बेंगळूरचा संघ सोमवारच्या सामन्यात शेवटच्या षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी कशी करता येईल यासाठी ते आपल्या फलंदाजांना कानमंत्र देतील. बेंगळूरचे गोलंदाज शेवटच्या काही षटकात शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजी करण्यामध्ये कमी पडत असल्याने त्यांच्या गोलंदाजांना आपल्या शैलीमध्ये सुधारणा करावी लागेल. बेंगळूरचा संघ या चालू आयपीएल मोसमात आपला दुसरा विजय नोंदवण्यासाठी आतुरलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात बेंगळूरच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत कोलकाता संघाचे पाच फलंदाज 89 धावात बाद केले होते पण त्यानंतर बेंगळूरच्या गोलंदाजांना कोलकाताच्या फलंदाजांना शेवटच्या काही षटकामध्ये फटकेबाजीपासून रोखता आले नाही. कोलकाता संघाने 20 षटकात 7 बाद 204 धावापर्यंत मजल मारली होती. तत्पुर्वी झालेल्या मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात बेंगळूरच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकामध्ये अधिक धावा दिल्या होत्या. हर्षल पटेल आणि मोहमद सिराज या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला नव्या चेंडू चांगला हाताळला पण त्यांना आपल्या गोलंदाजीच्या दुसऱ्या हप्त्यात अचूक गोलंदाजी करता आली नाही. बेंगळूर संघातील लंकेचा फलंदाज हसरंगा सध्या त्यांच्या देशाची राष्ट्रीय सेवा बजावत असल्याने तो उपलब्ध होऊ शकणार नाही. तसेच हॅझलवूड दुखापतीतून बरा होत असून त्याच्यावरच आता बेंगळूर संघाच्या शेवटच्या षटकातील जबाबदारी राहिल. टॉप्लेच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पार्नेलचा समावेश करण्यात आला आहे. बेंगळूर संघाची फलंदाजी गोलंदाजीच्या तुलनेत अधिक भक्कम वाटते. विराट कोहली आणि डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने मुंबई विरुद्धच्या सामन्यात दर्जेदार फलंदाजी करत विजय मिळवून दिला होता. आता लखनौच्या फिरकी गोलंदाजांसमोर बेंगळूरच्या फलंदाजांची सत्त्वपरीक्षा राहिल. शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनौच्या फिरकी गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला हैद्राबादविरुद्ध पाच गड्यांनी विजय मिळवून दिला होता. रवि बिश्नोई त्याने आतापर्यंत सहा गडी बाद केले आहेत. त्याला अमित मिश्रा आणि कृणाल पांड्याची बऱ्यापैकी साथ मिळत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याला फ्ल्यू झाल्याने त्याला यापूर्वीचा सामना हुकला होता. त्याचप्रमाणे आवेश खानलाही दुखापत झाली आहे. मार्क वूड आणि आवेश खान हे सोमवारच्या सामन्यात खेळण्यासाठी पुर्ण तंदुरुस्त असतील तर मात्र बेंगळूर संघाला विजयासाठी अधिक झगडावे लागेल. लखनौ सुपरजायंट्सने आतापर्यंत या स्पर्धेत 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. या संघाची फलंदाजी भक्कम असून कर्णधार के एल राहुल, मेयर्स, अष्टपैलू स्टोइनिस, दीपक हुडा, पुरन हे प्रमुख फलंदाज आहेत.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), मेयर्स, हुडा, कृणाल पांड्या, अमित मिश्रा, पुरन, नवीन उल हक, बडोनी, आवेश खान, कर्ण शर्मा, चरक, यश ठाकुर, शेफर्ड, मार्क वूड, स्वप्नील सिंग, व्होरा, सॅम्स, पी. मंकड, के. गौतम, जयदेव उनादकट, स्टोईनिस, बिश्नोई, मयांक यादव.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहमद सिराज, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, शहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, अॅलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव आणि मिचेल ब्रेसवेल.
सामन्याची वेळ – 7.30 वाजता









