प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर-बेळगाव सकाळची विमानफेरी पुन्हा सुरू केली जाणार आहे. इंडिगो एअरलाईन्सने 20 डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला ये-जा करणाऱ्यांची सोय होणार आहे. तसेच डिसेंबर महिन्यात अधिवेशन होणार असल्याने या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
विमानांची कमतरता असल्याने ऑक्टोबर 28 पासून बेंगळूर-बेळगाव सकाळची विमानफेरी रद्द करण्यात आली होती. या विमानफेरीमुळे बेंगळूरहून बेळगावला येणारे अधिकारी, उद्योजक यांना सर्वाधिक फटका बसला. नागरिकांनी नाराजी व्यक्त करताच बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी हवाई उ•ाणमंत्र्यांची भेट घेऊन विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून इंडिगोने डिसेंबरपासून विमानफेरी पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.









