हुबळीत विनाकारण तासाभराचा विलंब : लोंढा-मिरज एक्स्प्रेसलाही उशीर
बेळगाव : बेळगावमधील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरू लागली आहे. एक्स्प्रेस बेंगळूरहून येताना हुबळी रेल्वेस्थानकात तब्बल तासभर विनाकारण थांबविली जात आहे. यामुळे बेळगावमध्ये पोहोचण्यास रेल्वेला उशीर होत असून याचा फटका दररोज शेकडो प्रवाशांना बसत आहे. यामुळे एक्स्प्रेस वेळेत दाखल व्हावी, यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेंगळूर-बेळगाव सुपरफास्ट एक्स्प्रेस रात्री 9 वाजता बेंगळूरहून सुटते. पहाटे 4.20 च्या सुमारास हुबळी रेल्वेस्थानकात दाखल होते. परंतु, या रेल्वेस्थानकात तब्बल तास ते सव्वातास एक्स्प्रेस थांबविली जाते. मागील काही महिन्यांपासून हा प्रकार घडत असून यामुळे बेळगावपर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. केवळ हुबळी येथेच नाही तर लोंढा व खानापूर रेल्वेस्थानकांमध्येही 15 ते 20 मिनिटे एक्स्प्रेस थांबविली जाते.
लेंढा-मिरज एक्स्प्रेसलाही विलंब
बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस जोवर पुढे निघून जात नाही, तोवर लोंढा-मिरज अनारक्षित एक्स्प्रेस लोंढा येथेच थांबून असते. मार्ग मोकळा नसल्याने लोंढा-मिरज एक्स्प्रेसमधील प्रवासी लोंढा रेल्वेस्थानकात अडकून पडतात. ज्या वेळी बेळगाव एक्स्प्रेस निघून जाते, त्यानंतरच लोंढा एक्स्प्रेस सोडली जात आहे. सकाळी 6.40 वाजता लोंढा येथून निघणारी लोंढा-मिरज एक्स्प्रेस बऱ्याच वेळा 7.30 ते 8 वाजून गेले तरी लोंढ्यामध्येच अडकून राहते. यामुळे पुढील प्रवासाचा कालावधी वाढत आहे. या एक्स्प्रेसवर केवळ बेळगावचेच नाही तर पुढे जाणाऱ्या रायबाग, कुडची, घटप्रभा, मिरज येथील प्रवाशांना रेल्वेच्या गैरसोयींचा फटका बसत आहे.
तांत्रिक कारण पुढे
रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी तांत्रिक कारण पुढे केले. सध्या हुबळी-वास्को व हुबळी-विजयपूर रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील एखादी एक्स्प्रेस उशिराने दाखल झाली तर पुढील एक्स्प्रेस थांबवावी लागत असल्याचे कारण देण्यात आले. मात्र, इतर एक्स्प्रेससाठी बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेसवरच अन्याय का? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.









