सरपंच सुखानंद गावडे यांचे उद्गार : संजीवनतर्फे सरपंच, पंचसदस्यांचा गौरव
वार्ताहर /मडकई
कचरा व मलनिस्सारण हे दोन्ही प्रकल्प वीजमंत्री सुदिन ढवळीकर व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांच्या सहकार्यांने राबवून बांदोडा पंचायत क्षेत्र स्वच्छ सुंदर बनवण्याचा मानस सरपंच सुखानंद गावडे यांनी व्यक्त केला. पंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या सोडवितानाच आजू बाजूला वाढलेली बेसुमार झाडुपे कापून टाकण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
बांदोडा येथील संजीवन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गृहपरिचारीका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे स्वागत व नवनीर्वाचित बांदोडा पंचायत मंडळाचा गौरव या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजीवन संस्थेच्या सर्वेसर्वा आशाताई सावर्डेकर, उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य मुक्ता नाईक, डॉ. उपेंद्र दिक्षीत व डॉ. माधवीलता दिक्षीत आदी व्यासपीठावर उपस्थीत होते. आशाताई सावर्डेकर यांच्या कार्याचे कौतुक सर्वच स्थरातून होत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱया संजीवन संस्थेला बांदोडा पंचायतीचे सदोदीत सहकार्य असेल, असे सरपंच श्री. गावडे पुढे म्हणाले.
संजीवन संस्थेने अनेक उपक्रम राबवून युवक युवतीच्या आयुष्याला दिशा दिलेली आहे. परिचारीका व शिवणकाम यांचे प्रशिक्षण देताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आई वडिलांच्या अकाली मृत्युमुळे मुले अनाथ बनत आहेत. अशा मुलांचे सगोपन व्हायलाच हवे. त्यासाठी संजीवन संस्थेने त्यांना दत्तक घेऊन संस्थेच्या कार्यात भर घालावी असे आवाहन उपसरपंच चित्रा फडते यांनी केले.
डॉ उपेंद्र दिक्षीत म्हणाले, रूग्ण, डॉक्टर, परिचारका व औषधे या सर्वानी आपापले काम व्यवस्थीत केल्यास रोगी माणूस लवकर बरा होतो. औषधे दर्जेदार असायला हवीत. डॉक्टरांनी त्यांचे कर्तव्य बजावताना रूग्णाशी सुसंवाद साधावा. परिचारीकांनी वेळचेवर औषधे दिल्यास व पथ्य पाळून रूग्णांनी सहकार्य कुठलाही आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.
यावेळी आशाताई सावर्डेकर, डॉ माधवीलता दिक्षीत, ममता बदामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच सुखानंद गावडे, उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य मुक्ता नाईक यांचा गौरव तर ममता बदामी यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन आशाताई सावर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.









