पवन कल्याणांकडून समर्थन : आंध्रप्रदेशात बंदला संमिश्र प्रतिसाद
वृत्तसंस्था/ अमरावती
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेच्या विरोधात पक्षाकडून सोमवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. आंध्रप्रदेश सीआयडीने माजी मुख्यमंत्री नायडू यांना कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी शनिवारी अटक केली होती. तर रविवारी सकाळी विजयवाडा येथील भ्रष्टाचारविरोधी न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले होते.
लोकशाहीवादी मूल्ये कायम रोखण्यासाठी या बंदमध्ये सामील व्हावा असे आवाहन तेदेप प्रदेशाध्यक्ष किंजरापु अचेन नायडू यांनी लोकांना केले. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तेदेपेच्या समर्थकांनी काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करत दुकाने बंद करविली आहेत. तर पोलिसांनी तेदेपच्या वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेत बंद रोखण्याचा प्रयत्न केला.
जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेची निंदा करत माजी मुख्यमंत्र्यांना समर्थन दर्शविण्यासाठी विजयवाडाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्यांना रोखले होते. यानंतर रस्तेमार्गाने विजयवाडा येथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवन कल्याण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
45 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत तेलगू भाषिकांची निस्वार्थ सेवा केली अणि जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी जीवन बलिदान करण्यासही तयार आहे. जनतेची सेवा करण्यापासून मला कुठलीच शक्ती रोखू शकत नसल्याचे चंद्राबाबू यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद पेले आहे.









