मंत्री गोविंद गावडेंकडून पाहणी
वार्ताहर /माशेल
बाणस्तारी मार्केट प्रकल्पाचे काम 80 टक्के पुर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन ते अडीच महिन्यात पूर्ण होणार आहे. येत्या 19 डिसें. रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन होऊन व्यापाऱयांसाठी प्रकल्प खुला करण्यात येईल, अशी माहिती स्थानिक आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी बाणस्तारी मार्केट प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पासंबंधी स्थानिक देवस्थान समितीकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्याला अनुसरून ही पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक सरपंच दामोदर नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, माशेलचे सरपंच जयेश नाईक, देवस्थान समितीचे सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते. आदिवासी कल्याण खात्याच्या अधिकारी योगीनी देसाई, गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अभियंते, व्यवस्थापक सतीश पवार, साहाय्यक व्यवस्थापक सोमेश फळदेसाई, कन्सलटंट चंदन परब, गौरव मडगावकर व कंत्राटदारांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात देवस्थान समितीची काही जमिन येत असल्याने त्यासंबंधी मंत्री गोविंद गावडे यांनी अधिकाऱयांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला. देवस्थान समितीतर्फे त्याला सहमती दर्शविण्यात आली. अंदाजे रु. 14 कोटी खर्चुन प्रशस्त असा हा मार्केट प्रकल्प उभारण्यात येत असून त्यात व्यापाऱयांसाठी दुकानांची व्यवस्था याशिवाय वाचनालय, बालवाडी व भव्य सभागृहाची सोय आहे. या प्रकल्पामुळे पंचायतीला महसुल उपलब्ध होणार आहे. स्थानिक बागायतदारांना आपला माल साठवून ठेवण्यासाठीही कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असेल. पुढील वर्षीचा चतुर्थी बाजार याच प्रकल्पात भरणार आहे, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.
सरपंच दामोदर नाईक यांनी मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रयत्नामुळे बाणस्तारीचा मार्केट प्रकल्प जलदगतीने पूर्णत्वास येत असल्याचे सांगितले.









