राज्याचे वन अन् पर्यावरण मंत्र्यांचा निर्देश : गणेशोत्सवाच्या तोंडावर सरकारची कठोर भूमिका
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाण्यामध्ये न विरघळणाऱ्या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरीस) मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक ठरत आहेत. अशा मूर्तींची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विसर्जन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची सूचना वन आणि पर्यावरणमंत्री ईश्वर खंड्रे यांनी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मागील वर्षी देखील राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर रोखण्यासाठी दिशानिर्देश जारी केले होते. राष्ट्रीय हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांमुळे देशभरात पर्यावरणपूरक मूर्तींकरता राज्य सरकारांना वेळोवेळी सूचना जारी कराव्या लागत आहेत.
पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता मंत्री ईश्वर खंड्रे यांनी मंगळवारी बेंगळूरमधील आपल्या कार्यालयात पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नोटिसा बजावून देखील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जात असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी दिली.
निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 रोजी जलस्रोतांना हानीकारक असलेल्या रंगाच्या आणि पीओपी मूर्तींचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि विसर्जन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 21 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रक जारी केले. पीओपी आणि हानीकारक रंगाच्या मूर्तींचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि विल्हेवाट लावण्यावर निर्बंध घातले आहेत. आता या नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे, अशी सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना
जल संरक्षण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायदा-1986 अंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करण्यासंबंधीचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला दाद न देणाऱ्या, टाळे ठोकल्यानंतरही छुप्या पद्धतीने पीओपी गणेशमूर्ती तयार करणारे, वाहतूक, साठा करणे आणि विक्रीमध्ये गुंतलेल्यांविरुद्ध कोणत्याही दबावाला बळी न पडता फौजदारी गुन्हे नोंद करण्याची सूचना मंत्री ईश्वर खंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
पीओपी आणि रासायनिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्ती तळे, तलाव, नदी, विहीर, जलाशयांमध्ये विसर्जित केल्यास पाण्यात शिसे, निकेल, क्रोमियम यासारखे धातू मिसळतात. पीओपी पाण्यात विरघळत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिस जलस्रोतांमध्ये साचून राहिल्याने जलचरांचा मृत्यू होतो. हे पाणी पिणाऱ्या जनावरांनाही धोका आहे. त्यामुळे जनतेच्या हितार्थ व सामुदायिक आरोग्य रक्षणासाठी पीओपी गणेशमूर्तींची निर्मिती, विक्रीवर बंदी घालणे अनिवार्य आहे, असेही ते म्हणाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा पातळीवर अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन राज्यभरात पीओपी गणेशमूर्तींच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, असा आदेश दिला.









