कोणता देश आपल्या नागरीकांवर कोणते निर्बंध घालेल हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे. विशेषत: कोरोनाच्या उद्रेकानंतर अशा विचित्र वाटणाऱ्या नियमनांचे प्रमाण वाढले आहे. युरोपातील क्रोएशिया या देशाने अशाच अत्यंत जाचक आणि विचित्र नियमांची घोषणा केली आहे. या नियमानुसार प्रवाशांना चाके असलेल्या बॅगा घेऊन प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अलिकडच्या काळात बहुतेक प्रवासी बॅग उचलण्याचे कष्ट नकोत म्हणून, आणि हमालांना अव्वाच्या सव्वा पैसे द्यावे लागू नयेत म्हणून चाके असलेल्या बॅगांना प्राधान्य देतात. बहुतेकांकडे अशा बॅगा असतात. त्यामुळे बॅगेचा दांडा धरुन ती चालवत कोठेही जाता येते. लहान मुलेही अशा बॅगा लीलया एका स्थानावरुन दुसऱ्या स्थानी नेऊ शकतात. पण या देशात यावर बंदी आणण्यात आल्याने तेथील नागरीकांची चांगलीच कोंडी झाली असून या निर्बंधाला विरोध होत आहे.
असा नियम का केला याचे कारणही तितकेच विचित्र आहे. या देशात अनेक स्थानी प्राचीन काळी होते तसे दगडांचे मार्ग आहेत. अशा मार्गांमुळे शहरांना प्राचीन ‘लुक’ येतो आणि पर्यटकांची संख्या वाढते. पण अशा मार्गांवरुन चाकांच्या बॅगा चालवत नेल्याने मोठा आवाज होतो. त्याने शांततेचा भंग होतो. रात्री तर हा आवाज अधिकच जाणवतो. त्यामुळे हा निर्बंध घालण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या आवाजावर कोणतेही नियंत्रण नसलेल्या भारताच्या नागरीकांना असा निर्बंध् म्हणजे वेडेपणाच वाटण्याची शक्यता दाट आहे.









