आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय ः चेंगराचेंगरीच्या घटनांची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय सभांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांनंतर राज्यातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर राजकीय सभा आणि पदयात्रा आयोजित करण्यावर बंदी घातली आहे.
तेलगू देसम पक्षाकडून कंडुकुर आणि गुंटूरमध्ये अलिकडेच आयोजित सभांमध्ये चेंगराचेंगरीचे प्रकार घडले होते. या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता. तर कित्येक जण जखमी झाले होते. दोन्ही घटना पाहता राज्य सरकारने राजकीय सभांवरून नवा दिशानिर्देश जारी केला आहे. या निर्णयावरून सरकारवर टीका देखील होत आहे.
विरोधी पक्षांकडून होणाऱया सभा आणि पदयात्रा रोखण्यासाठी राज्य सरकारने हा आदेश काढल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तेलगू देसम पक्षाकडून कंडुकुर आणि गुंटूरमध्ये राजकीय सभांचे आयोजन करण्यात आले होते. नेल्लोर जिल्हय़ातील कंडुकुर जिल्हय़ात झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांना जीव गमवावा लागला होता. तर गुंटूर येथील चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला होता. दोन राजकीय सभांमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना घडल्यावर राज्य सरकार जागे झाले असून नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
गृह विभागाकडून यासंबंधी सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग किंवा त्याच्या नजीक कुठल्याही प्रकारच्या राजकीय सभा किंवा बैठका करण्याची अनुमती दिली जाऊ नये असे यात नमूद आहे. तसेच ग्रामपंचायत आणि पालिकेच्या रस्त्यांवरही राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच काही अटींसह राजकीय कार्यक्रमांना अनुमती दिली जाऊ शकते असे म्हटले गेले आहे.
लोकांची सुरक्षा पाहता रस्ता किंवा त्याच्या शेजारी राजकीय सभा तसेच बैठकांना अनुमती दिली जाऊ नये. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची निर्मिती जलद वाहतुकीसाठी करण्यात आली आहे. या रस्त्यांवर राजकीय सभा, पदयात्रा झाल्यास व्यापार-व्यवसायाशी निगडित हालचालींना अडथळा निर्माण होईल. कुठल्याही अर्जदाराला राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर राजकीय सभा घेण्याची अनुमती दिली जऊ नये. अशा अर्जदारांना पर्यायी जागा शोधण्यास सांगितले जावे असे आदेशात म्हटले गेले आहे.









