बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध : ‘डीजीएफटी’कडून अधिसूचना जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेशी व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत ही माहिती दिली. देशातील तांदळाच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, तांदळाच्या निर्यातीला काही अटींसह परवानगी दिली जाईल. अधिसूचनेनुसार बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली नाही. भारतात गेल्या काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला याबरोबरच डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कमकुवत मान्सूनमुळे तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनावर परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत. याचदरम्यान देशातील तांदळाच्या किमती वाढू नयेत म्हणून सरकारने निर्यातीवर बंदी घातली आहे.
गेल्या दहा दिवसात देशभरात तांदळाच्या दरात 20 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या निर्यातीवर निर्बंध लादण्यात आले असून काही अटी-शर्थी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच सध्या निर्यातीसाठी सज्ज असलेल्या साठ्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. तसेच काही देशांच्या अन्नसुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन सरकार परवानगी देऊ शकते. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. गेल्यावषी सप्टेंबरमध्ये सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच विविध प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्यात आले होते.
पेरण्या कमी झाल्याने सरकार चिंतेत
14 जुलैपर्यंत देशात खरीप पिकांची पेरणी गेल्या वषीच्या तुलनेत 2 टक्के कमी झाली आहे. एकूण पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी भात पिकाची पेरणी 6.1 टक्के क्षेत्रावर झाली आहे तर डाळी पिकांची पेरणी 13.3 टक्के क्षेत्रात झाली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख खरीप भात उत्पादक राज्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे पेरणीला विलंब झाला आहे. किंवा काही भागात दुबार पेरणीची नामुष्कीही ओढवलेली आहे. अपुरा पाऊस झाल्याने भात आणि कडधान्य पेरणीखालील क्षेत्र घटले आहे. अजूनही पुढील दोन आठवडे कडधान्य आणि भात पेरणीसाठी महत्त्वाचे आहेत.









